अनेकांना आपल्या वाढत्या वजनामुळे वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळी अपमानही सहन करावा लागतो. विशेषत: सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना लठ्ठपणामुळे अनेक अडचणी येतात. आपल्या घरात आपण आपल्या वजन, आकारानुसार खुर्च्या, टेबल, बेड सेट करुन घेऊ शकतो. पण सार्वजनिक वाहनांमध्ये किंवा विमानामध्ये सर्वाधिक व्यक्तींच्या साधारण आकारमानानुसार सीट्स बसवलेल्या असतात. याच विमानातील सीट्समुळे एका लठ्ठ तरुणीला मोठा अडचणींचा सामना करावा लागला आहे. जास्त वजनामुळे विमानातील सीटवर बसण्यात तिला अडचणी आल्या आहेत. यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक भलीमोठी पोस्ट करत अशी एक मागणी केली आहे.

लठ्ठ व्यक्तींना विमानातील सीट्समुळे बसण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी फ्री सीट्सची व्यवस्था असतील पाहिजे जेणेकरून ते मोफत प्रवास करु शकतील, अशी मागणी या तरुणाने केली आहे.

जेलिन चॅने असं या तरुणीचे नाव असून ती कॅनडामधील व्हँकुव्हर येथे राहते. व्यवसायाने ती एक ट्रॅव्हल, लाईफस्टाइल क्रिएटर आहे. जेलिनने फेडरल एव्हिएशन ऑथॉरिटीकडे मागणी करत म्हटले की, ओव्हर साइज प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या आरामदायी प्रवासासाठी योग्य आकाराचे कोच ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच प्रवाशांना त्यांच्या वजनामुळे जादा बुक करण्याची सक्ती केली जात असेल तर त्यांना त्यांचे पैसे परत करावे असेही तिने म्हटले आहे. यासाठी इन्स्टाग्रामवर तिने #BodyEqualityInTravel हा हॅशटॅग चालवला आहे.

तिने याबाबत एक याचिका दाखल करत म्हटले की, ओव्हरसाइज असल्यामुळे मला आणि माझ्या जोडीदाराला विमान उड्डाण करताना दुर्दैवाने भेदभाव आणि गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. तिच्या याचिकेवर शनिवारी दुपारपर्यंत सुमारे ४३०० जणांनी स्वाक्षरी केल्या आहेत.

जलिनने आपल्या याचिकेत पुढे म्हटले की, सर्व प्लस साइजच्या प्रवाशांना त्यांच्या आकारानुसार अतिरिक्त मोफत जागा, दोन किंवा तीन सीट्स देण्यात याव्यात. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे. तसेच तिने विमानातील सीटवर बसलेला एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, सीटवर बसताना तिला अडचणी येत आहे, त्यामुळे ती व्यवस्थितपणे सीटवर बसू शकत नाही. इन्स्टाग्रामवर जेलिनचे ९३ हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

जेलिनने आणि तिचा प्रियकर डेनवरहून पास्कोदरम्यान प्रवास करत असताना त्यांना अनेक नकारात्मक कमेंट्स ऐकाव्या लागल्यात, लोक दोघांकडे वेगळ्या नजरनेने पाहत होते, तसेच त्यांच्याबाजूसा बसण्यासही नकार देत होते, त्यांना आपल्यासोबत भेदभाव होत असल्याचे वाटू लागले, असाच अनुभव दोघांना अन्य एका फ्लाइटमध्येही आला. त्यांना एकाच सीटवर बसण्यास सक्ती करण्यात आली ज्यामुळे त्यांना अनेक शारीरिक वेदना सहन कराव्या लागल्या.