एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर त्याचा मित्रपरिवार, नातेवाईक त्याला अनेक शुभेच्छा देतात. सोशल मीडियामुळे आता अशा शुभेच्छा देणेही अतिशय सोपे आणि कल्पक झाले आहे. लोकं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देऊ शकतात. यासाठी ते स्टिकर्स, gif, व्हिडीओ, ग्राफिक फोटो, यांचा वापर करतात. सोशल मीडियावर अशावेळी शुभेच्छांचे भन्नाट मेसेजही व्हायरल होत असतात. त्यातच वाढदिवस एखाद्या मोठ्या नामवंत व्यक्तीचा असेल तर त्याला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर जणू पूरच येतो.
गेल्या काही दिवसांपूर्वीच म्हणजेच ११ ऑक्टोबरला महानायक अमिताभ बच्चन यांनी आपला ८०वा वाढदिवस साजरा केला. यावेळीही त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यातील काही शुभेच्छा अतिशय अनोख्या होत्या. मात्र आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी अमिताभ बच्चन यांना अतिशय खास शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी त्यांच्या कल्पकतेचे कौतुक करावे तितके कमी.
हर्ष गोयंका यांनी १५ ऑक्टोबरला ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो अमिताभ बच्चन यांचा आहे. या फोटोचं वेगळेपण म्हणजे, या एकाच फोटोमध्ये तीन वेगवेगळे ब्रॅण्ड्स आहेत. मात्र हे तीनही ब्रॅण्ड्स आता कालबाह्य झाले आहेत. हर्ष गोयंका यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “बजाज स्कूटर…..गेली, फियाट पद्मिनी…….गेली, राजदूत ………गेले, पण हा ब्रँड ८०व्या वर्षीही बहरतोय…..#८०वर्षे”
हर्ष गोयंका यांनी आपल्या या ट्वीटमधून अतिशय सुंदर संदेश दिला आहे. त्यांच्या फोटो मध्ये त्यांनी बजाज स्कुटर, फियाट पद्मिनी, आणि राजदूत टायर्स यांना बाणांनी अधोरेखित केले आहे. त्याचप्रकारे त्यांनी अमिताभ यांनाही अधोरेखित केलंय. कित्येक कंपन्या आल्या आणि गेल्या, मात्र अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता वयाच्या ८०व्या वर्षीही कमी झालेली नाही. हा एक फोटो खूप काही बोलून जातो. नेटकऱ्यांना हा फोटो फारच आवडला असून त्यांनी या ट्वीटवर सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत.