Pakistani Police vs Soldiers Conflict : समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी पोलीस व लष्करी जवानांसारखा गणवेश परिधान केलेले काही जवान एका चौकात उभे आहेत. त्यांच्या गाड्या देखील शेजारीच उभ्या आहेत. हे जवान तपास करत असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र काही सशस्त्र लोकांची टोळी त्यांना अडवत आहे. या टोळीतील लोक जवानांना तिथून निघून जाण्यास सांगत आहेत, तसेच त्यांना धमकावत आहेत. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असून हे पाकिस्तानी सैनिक व पोलिसांमधील भांडण असल्याचा दावा केला जात आहे.

हातात एके-४७ व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन गन्स घेतलेल्या टोळीतील लोक जवानांना तिथून निघून जाण्यास सांगत आहेत. “तुमचं डोकं खराब झालंय का? तुम्ही इथे काय करताय? इथे टाइमपास करण्यापेक्षा काश्मीरला जा”, असं सांगत आहेत. तर पलिकडून कोणीतरी पाकिस्तानी लष्करप्रमुखांचा उल्लेख केला. त्यावर या टोळीतील एक इसम जवानांना म्हणाला, “पाकिस्तानी लष्करप्रमुखांना आम्ही आमच्या चपलेखाली ठेवतो. तुम्ही बंदुका खाली करा, इथे मुली आहेत तुम्हाला दिसत नाही का? तुमचं शौर्य काश्मरमध्ये जाऊन दाखवा, आम्ही तुमचं शौर्य पाहिलंय, पाकिस्तानच्या सीमेवर जा”, असा इशारा या जवानांना दिला जात आहे.

हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याची लोकसत्तेने पुष्टी केलेली नाही. हा केवळ एक व्हायरल व्हिडीओ असून पाकिस्तानमधील असल्याचा दावा केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांकडून पाकिस्तानची खिल्ली

काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटक ठार झाले आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना या हल्ल्यामागे असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे देशभरातून पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय लष्कर लवकरच पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करेल, असा दावा केला जात आहे. अशातच पाकिस्तानमधील नेते, त्यांचे लष्करी अधिकारी भारताला युद्धाचं आव्हान देत आहेत. तसेच, भारताने पाकिस्तानवर कारवाई केल्यास अथवा त्यांच्यावर हल्ला केल्यास पाकिस्तान भारतावर अणूबॉम्ब टाकेल, अशा धमक्या देत आहेत. अशातच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेक नेटकरी पाकिस्तानची थट्टा उडवत आहेत. “स्वतःच्या देशातील भांडणं मिटत नाहीत आणि निघालेत भारतावर हल्ला करायला”, अशा पद्धतीच्या कमेंट्स या व्हिडीओवर वाचायला मिळत आहे.