महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक विचित्र घटना व्हिडीओद्वारे समोर आली आहे. त्यानुसार एका व्यक्तीला साप चावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अंधश्रद्धेतून काही लोक रुग्णालयातच अघोरी विद्येने रुग्णावर उपचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यामुळे उपचारांसाठी आता त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यातील करंजगावातील सोन्या लाडक्या ठाकरे या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर विश्वास न ठेवता, रुग्णालयातच एका मांत्रिकाला बोलावले. यावेळी मांत्रिकाने रुग्णावर अघोरी विद्येचा वापर केला. अघोरी विद्येचा हा प्रकार रुग्णालयातील सर्व कर्मचारी पाहत होते. रुग्णावर लवकर उपचार करण्याचे ते प्रयत्न करीत होते; मात्र मांत्रिक अघोरी विद्येचा जप करीत राहिला. या प्रकारामुळे सोमा ठाकरे यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाली. त्यानंतर रुग्णाला तातडीने दादरा नगर हवेली येथील सेल्वासा येथील विनोबा भावे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, अगोदरच्या त्या रुग्णालयात अघोरी विद्येचा हा प्रकार सुरू असताना अधिकारीवर्ग काय करीत होता, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिथे असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करीत तो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित रुग्णालयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण घटनेसाठी रुग्णालय व्यवस्थापनाला जबाबदार धरले जात आहे. आता रुग्णालयात त्या तांत्रिकाला या अघोरी विद्येचा वापर का करू देण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.