महाराष्ट्रामधील एका पर्यटकाचा कुल्लू जिल्ह्यामध्ये पॅराग्लायडींग करताना दुर्देवी मृत्यू झाला आहे. येथील दोभी परिसरामध्ये पॅराग्लायडींग करताना शनिवारी झालेल्या दुर्देवी अपघातात या पर्यटकाने प्राण गमावला. अपघात झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार हा पर्यटक शेकडो फूट उंचीवरुन खाली पडला. पॅराग्लायडींग करताना हार्नेसमध्ये (दोरी) गडबड झाल्याने हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला असला तरी त्याच्याबरोबर असलेला पॅराग्लायडर सुरक्षित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव सुरज संजय शाह असं आहे. ३० वर्षांचा सुरज हा साताऱ्यातील शिवरळ गावातील रहिवाशी होता. तो त्याच्या मित्रांबरोबर मनाली फिरायला गेला होता. या प्रकरणामध्ये कूल्लूचे पोलीस अधिक्षक गुरुदेव शर्मा यांनी रविवारी या अपघातासंदर्भात पोलीस स्थानकात माहिती मिळाल्याचं सांगितलं. एक व्यक्ती पॅराग्लायडींग करताना पडली असून फार उंचावरुन ही व्यक्ती जमीनीवर पडल्याचं आम्हाला सांगण्यात आलं.

“पॅराग्लायडर सुरक्षित असून पर्यटकाचा मात्र जागीच मृत्यू झाला आहे. कलम ३३६ अंतर्गत (दुसऱ्यांचा जीव धोक्यात टाकणे) बेजबाबदारपणे वागल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ३०४ अ (बेजबादारपणामुळे दुसऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणं) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आहे,” असंही पोलीस अधिकक्षकांनी सांगितलं.

अशाप्रकारे पॅराग्लायडिंग करताना अपघात झाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. या मौसमात अनेकदा असे प्रकार घडले आहेत. जानेवारी महिन्यामध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने राज्यातील साहसी खेळांवर बंदी घातली आहे. बंगळुरुमधील १२ वर्षीय मुलाचा बीर बिलिंग येथील पॅराग्लायडिंग साईटवर मृत्यू झाल्याप्रकरणी न्यायालयाने हे निर्देश दिले होते.

न्यायालयाने साहसी खेळांसंदर्भात तांत्रिक समिती नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. यानंतरच्या तपासामध्ये साहसी खेळांचं नियोजन करणाऱ्या अनेकांकडे सदोष साहित्य असल्याच समितीला आढळून आलं होतं. एप्रिल महिन्यामध्ये किमान सुरक्षा निश्चित करणारं साहित्य असलेल्यांनाच पुन्हा साहसी खेळ सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paragliding tourist from satara maharashtra falls hundreds of feet to death as harness fails scsg
First published on: 26-12-2022 at 12:26 IST