जीवन आहे म्हटलं तर तसा मृत्यूही अटळ आहे. पण तरीही आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर होणारं दुख:, वेदना, अश्रू थांबवता येत नाही. माणूस म्हटलं तर या भावना आल्याच. म्हणूनच तर एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या किंवा तिच्या जाण्याने शोकसागरात बुडालेले आपण अनेकजण पाहतो. पण एखाद्या प्राण्याला आपल्या जोडीदाराच्या जाण्याने झालेलं दु:ख तुम्ही फार कमी वेळा पाहिलं असेल किंबहुना पाहिलंच नसेल. पण असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत.
आपल्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नेला जात असताना एक मोर त्यांच्या मागे चालत असल्याचा व्हिडीओ नेटकऱ्यांना भावूक करत आहे. व्हिडीओत दोन व्यक्ती एका कापडातून मृत्यू झालेल्या मोराला नेत असताना दुसरा मोर त्यांच्या मागे चालत असल्याचं दिसत आहे. आपल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतरही त्याची साथ न सोडणारा हा मोर पाहून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे दोन्ही मोर चार वर्षांपासून एकत्र होते. त्यामुळे मृत्यूनंतरही आपल्या जोडीदाराची साथ सोडण्यास हा मोर तयार नव्हता. अंत्यसंस्कार होईपर्यंत हा मोर त्यांचा पाठलाग करत होता. भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. राजस्थानमधील कुचेरा येथील हा व्हिडीओ आहे.
मोर मृत्यूनंतरही आपल्या जोडीदाराची साथ सोडण्यास तयार नाही. मनाला स्पर्श करणारा व्हिडीओ असं त्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ व्हॉट्सअपवर आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून १९ सेकंदाच्या या व्हिडीआला १ लाख २६ हजारांहून जास्त लोकांनी पाहिला आहे.
प्रवीण कासवान नेहमीच प्राण्यांचे असे व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटला शेअर करत असतात.