Cat Snake Viral Video : सापाचं नाव काढली तरी भीती वाटते. त्यामुळे तो समोर असेल, तर काय अवस्था होईल काही सांगण्याची गरज नाही. अनेक भले भले प्राणी सापापासून अंतर ठेवून राहतात. पण सध्या सोशल मीडियावर जंगलातील साप आणि मांजरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल यात शंका नाही. या व्हायरल व्हिडीओत एक मांजर साप चक्क तोंडात पकडून घेऊन जाताना दिसतेय. त्यानंतर मांजर असं काही करते की, ते पाहून मालक तर हसतोच; पण ते पाहून तुम्हालाही हसू येईल.

मांजरीचा हट्टीपणा, मालक त्रस्त

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक गोंडस मांजर घरामागील बागेतून घरी परतत होती; पण येताना ती एकटी नाही, तर तोंडात चक्क एका काळ्या रंगाच्या सापाला पकडून घेऊन येत होती. अशा प्रकारे मांजर एका सापाला घरी घेऊन येत असल्याचे तिचा मालक पाहतो आणि तिला रोखण्याचा प्रयत्न करतो. पण मजेशीर बाब म्हणजे मालक मांजरीला हाकलून लावण्याचा प्रयत्न करीत होता; मात्र त्याचे काही न ऐकता मांजरीने सापाला तोंडातून खाली सोडलं नाही. ती मालकाकडे दुर्लक्ष करून, आपल्याच रुबाबात सापाला घरात घेऊन जात होती. पण, मालक मात्र तिला काठीने दूर लोटण्याचा प्रयत्न करीत होता. त्यानंतर अखेर मांजर एका ठिकाणी थांबली; पण नंतर पुन्हा ती सापाला घेऊन चालू लागली. मांजरीचा हट्टीपणा मालकासाठी एक प्रकारे त्रासच होता; पण त्याला मांजरीकडे बघून हसूही येत होतं. पण अखेर त्यानं मांजरीला सापाला घेऊन घरात जाण्यापासून रोखलं. या व्हिडीओवर आता अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

नेटीझन्सनी मालकाची उडवली खिल्ली

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही; पण अनेकांनी हा व्हिडीओ पाहून मालकाची चांगलीच खिल्ली उडवली आहे. अनेकांनी त्यांच्या घरातील मांजराने अशाच प्रकारे एखादी अनपेक्षित गोष्ट घरात आणल्यानंतर घडलेल्या विनोदी घटनांबद्दल सांगितले आहे.

मांजराचा हा मजेशीर व्हिडीओ wittycatty11 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मांजर मालकाला सांगतेय की, मी तुमच्यासाठी भेटवस्तू घेऊन आलीय. दुसऱ्याने लिहिले की, नाही थांबा, ती त्याची गर्लफेंड असेल; जी अशा प्रकारे साप बनली आहे. त्यामुळे मांजराला जाऊ दे. तिसऱ्याने लिहिले की, लहान मुलांप्रमाणे मांजरही अशी घातकं कृत्य करूनही इतकी गोंडस कशी काय दिसते?