‘हा विमान प्रवास म्हणजे आमच्यासाठी नरकातला प्रवास होता’ अशी प्रतिक्रिया डेल्टा एअरलाईन्सनं प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी दिली आहे. मंगळवारी रात्री लँडिगच्या आधी काही प्रवाशांना विमानातील केबिनमधून धूर येताना दिसला यामुळे डेल्टा एअरलाईन्सच्या विमानात एकच घाबरगुंडी उडाली. प्रवाशांनी एमर्जन्सी एक्झिटमधून विमानाच्या पंखावर उड्या घेतल्या. सगळ्या प्रवाशांची विमानाबाहेर पडण्याची केविलवाणी धडपड सुरू झाली.
विमानाच्या पंखावर उभ्या असलेल्या प्रवाशांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रवाशांनी शेअर करत हा सर्वात वाईट विमान प्रवास असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. धुरामुळे आम्हाला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे आम्ही विमानातून मिळेल त्या वाटेनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अशी माहिती एका प्रवाशानं दिली होती. काही प्रवाशांना विमानात आग लागल्याचे किंवा शॉर्ट सर्किट झाल्याची भीती वाटली म्हणून सगळ्यांनी विमानाबाहेर धाव घेतली. दरम्यान हा धूर हायड्रॉलिक ऑइल ऑक्झिलिअरी पॉवर युनिटमध्ये पडल्यामुळे निर्माण झाला होता अशी माहिती डेल्टा एअरलाइन्सनं दिली.
यावेळी विमानात १४० हून अधिक प्रवासी होते. जीव वाचवण्यासाठी काही प्रवासी बाहेर पडले खरे पण यात अनेकजण किरकोळ जखमी देखील झाल्याची माहिती एअरलाइन्सनं दिली आहे.
