अमेरिकेतील सिअॅटलच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी एक भयानक प्रकार पाहायला मिळाला. वाहतूक कोंडीमुळे वाहनांची रांग लागली होती. त्यातून सिग्नलजवळ एकापाठोपाठ एक अशी वाहनं उभी होती, जो तो कधी एकदा सिग्नल सुटतो याची वाटत बघत होता आणि अचानक असे काही घडले की सगळेच अवाक् होऊन बघत बसले. कारण जमिनीवर लँड करत असलेले विमान रस्त्यावरील सिग्नलच्या खांबावर आदळलं आणि काही सेकंदात जोरदार स्फोट झाला.

रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या पेने फिल्ड विमानतळावर विमान उतरणार होतं. उतरत असताना रस्त्यावर असणाऱ्या सिग्नलच्या खांब्याला या विमानाचा तळभाग घासून गेला काही दूर अंतरावर जाऊन हे विमान रस्त्याच्या कडेला कोसळले. पण दुर्घटनेची मालिका इथेच संपली नाही. वाहनात बसलेले सारे चालक अवाक् होऊन हा प्रकार पाहत होते आणि पापणी लवते न लवते तोच जोरदार स्फोट होऊन विमानाचे तुकडे तुकडे झाले. काही कळायच्या आत सारा प्रकार घडला तेव्हा सिग्नलजवळ उभ्या असलेल्या गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. तर काहींनी गाड्या मागे घेत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. विमानाचा स्फोट झाला, गाड्यांचे नुकसान झाले पण वैमानिकांसहित सगळ्यांचे दैव बलवत्तर होते म्हणून सगळेच यातून आश्चर्यकारकपणे बचावले.