Pune Gym Death News: तरूणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे, याची उदाहरणे रोजच समोर येत असतात. बदलत्या जीवनशैलीनुसार अनेकजण स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही जण जिमचा पर्याय निवडतात. सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका जिमचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये व्यायाम करत असलेला एक तरूण खाली कोसळल्याचे दिसत आहे. ३७ वर्षीय तरूण अचानक खाली कोसळतो. हृदयविकाराच्या धक्क्याने या तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार, पिंपरी चिंचवड येथील एका जिममध्ये ३७ वर्षीय मिलिंद कुलकर्णी हे नियमित व्यायामासाठी जात होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते जिममध्ये व्यायाम करत होते. मात्र शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ते जिमममध्ये व्यायाम करत असताना अचानक कोसळले आणि हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.

मिलिंद कुलकर्णी व्यायाम करत असताना त्यांनी थोडा वेळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर पाणी पिऊन ते पुन्हा व्यायामासाठी सज्ज झाले होते. हा पूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. पाणी प्यायल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते तिथेच कोसळले.

कुलकर्णी खाली कोसळल्यानंतर जिममधील कर्मचारी आणि इतर लोक तातडीने त्यांच्या मदतीसाठी धावले, हेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर त्यांना लगेचच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

पोलीस काय म्हणाले?

इंडिया टुडे संकेतस्थळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुल बांगूर यांची प्रतिक्रिया दिली आहे. बांगूर म्हणाले की, ते या घटनेची चौकशी करत आहेत. चिंचवडमधील एका व्यायामशाळेत ३७ वर्षीय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. सकाळी ७ वाजता घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक व्यायामशाळेत पोहोचले. मिलिंद कुलकर्णी यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला, अशी आमची माहिती आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वडील आणि भावाचाही हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मिलिंद कुलकर्णी व्यावसायिक असून ते पुण्यात पत्नीबरोबर राहतात. त्यांच्या पत्नी डॉक्टर आहेत. कुलकर्णी यांच्या नातेवाईकांच्या हवाल्याने इंडिया टुडेने वृत्तात म्हटले की, मिलिंद कुलकर्णी यांच्या कुटुंबात हृदयाशी संबंधित आजाराचा इतिहास आहे. कुलकर्णी यांचे वडील आणि बंधू यांचाही हृदयविकाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे मिलिंद कुलकर्णी यांचाही अशाचप्रकारे मृत्यू झाल्याच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान संबंधित जिमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाच पाहत आहेत, त्यानंतरच मिलिंद कुलकर्णी यांच्या मृत्यूचे खरे कारण समजू शकेल, असे पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले.