महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याच्या मुद्यावरून नवा वाद पेटला आहे. कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचारीने मराठीत बोलण्यास नकार देत मराठी तरुणाशी उद्धट वर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला. या प्रकरणी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता एअरटेल प्रशासन आणि संबंधित महिला कर्मचारीने या प्रकारावर माफी मागितली आहे. त्यानंतर साताऱ्यातील एका बँकेत कर्मचारी मराठी बोलणाऱ्या वृद्धांबरोबर गैरवर्तणूक करत असल्याचे आरोप केले जात आहेत. अशाच प्रकारचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एक माणूस मराठी बोलण्यास सांगतो आहे, ते ऐकून दुसरा व्यक्ती हिंदी बोलण्याचा आग्रह धरत असल्याचे दिसत आहे. “हिंदी ही बोलेंगे (आम्ही हिंदी भाषेतच बोलणार!)” असे तो सांगतो. हा व्हिडिओ पुण्यातील वाघोली परिसरातील डी-मार्ट स्टोअरमधील आहे.
व्हिडिओमध्ये दिसतंय की, तो माणूस आणि त्याची पत्नी डी-मार्ट स्टोअरमध्ये चेकआउट रांगेत उभे आहेत. अचानक, दुसरा माणूस त्याला मराठी बोलायला सांगतो. “हिंदी ही बोलेंगे (मी फक्त हिंदी बोलणार),” असे तो म्हणतो. जेव्हा दुसरा माणूस त्याला पुन्हा मराठी बोलायला सांगतो तेव्हा तो म्हणतो, “नही बोलते (मी बोलणार नाही).” “सोशल मीडिया पे डालो… ये गलत तारिका है तुम्हारा… (सोशल मीडियावर पोस्ट करा… हे चुकीचे आहे),” असे तो पुढे म्हणतो. इतरांनी त्यांना शांत केले तेव्हा दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. “मेरे से बिना पुछे ये व्हिडिओ नही बना सकता (तो माझ्या संमतीशिवाय व्हिडिओ बनवू शकत नाही),” तो माणूस पुढे म्हणाला.
दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी म्हटले की, जर एखादी व्यक्ती महाराष्ट्रात राहत असेल तर त्याने मराठी बोलले पाहिजे, तर काहींनी असा युक्तिवाद केला की,”त्याला त्याला सर्वात चांगली माहिती असलेली भाषा बोलण्याची परवानगी दिली पाहिजे.”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुण्यातील वाकडेवाडी येथे एअरटेलच्या व्यवस्थापकाला त्याच्या ऑफिसमध्ये हिंदी भाषेच्या अनिवार्य केल्याचे फर्माना काढल्यामुळे मारहाण केल्यानंतर काही महिन्यांनी हा व्हिडिओ समोर आला आहे.