तुम्ही अनेकदा हुला हूप (Hula Hooping) हे लहान मुलांचं खेळणं पाहिलं असेल. हुला हूप हे खेळणं वर्तुळाकार मोठ्या रिंगसारखं असतं; जे कमरेत ठेवून गोल गोल फिरवलं जातं. पण, हे हुला हूप तुम्हाला व्यायाम करण्यासाठीही कमालीचं योगदान देतं. तसेच याचा उपयोग करून अनेक कार्यक्रमांत मनोरंजनासाठी मजेशीर खेळसुद्धा खेळण्यात येतात. सोशल मीडियावर याबाबतचाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात हुला हूप करून एका भारतीय तरुणीनं तिचं एक अनोखं कौशल्य दाखवलं आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात एन. एम. श्री ओवियासेना या भारतीय तरुणीनं शरीराभोवती पाच हुला हूप फिरवीत एका हातानं रुबिक क्युबचं कोडं सगळ्यात वेगात सोडवून दाखवलं आहे. भारतीय तरुणी रंगमंचावर उभी आहे आणि उजव्या हातात दोन, एक मानेच्या इथे, तर दोन कमरेभोवती व एक पायात हुला हूप फिरवताना दिसत आहे. भारतीय तरुणीचं हे अनोखं कौशल्य एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.

हेही वाचा…४९० कोटींचं लग्न लागताच आता नवरदेवाला २५ वर्षं तुरुंगवासाची शिक्षा होणार? पूर्ण प्रकरण जाणून व्हाल थक्क

व्हिडीओ नक्की बघा :

हुला हूप करून सोडवले कोडे :

व्हिडीओत तुम्हाला दिसेल असेल की, भारतीय तरुणी शरीराभोवती हुला हूप फिरवीत असताना एका हातानं रुबिक क्युबचं कोडंसुद्धा सोडवते आहे. तसेच हुला हूप आणि रुबिक क्युबचं कोडं या दोन्ही खेळांचे उत्तम सादरीकरण तरुणीनं सादर केलं आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ही भारतीय तरुणी ५१.२४ सेकंदांत रुबिक क्युबचं हे कोडं सोडवण्यात यशस्वी ठरली आणि सगळ्यात वेगात कोडं सोडवण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं तिची नोंद केली.

सोशल मीडियावर ही पोस्ट @guinnessworldrecords यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच “पाच हुला हूप फिरवीत असताना भारतीय तरुणी एन.एम. ओवियासेनाद्वारे ५१.२४ सेकंदांत सगळ्यात वेगात रुबिक क्युबचं कोडं सोडवलं गेलं आहे,” अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी भारतीय तरुणीच्या एकाग्रतेचं आणि तिच्या अद्भुत कौशल्याचं कमेंट्समध्ये कौतुक करताना दिसून आले आहेत.