Pythons Viral Video : आतापर्यंत तुम्ही घरात मांजर, कुत्रा, ससा, पांढरा उंदीर असे प्राणी पाळताना पाहिले असेल. पण, कधी भल्यामोठ्या अजगरांना घरात कोणी पाळले असे पाहिले आहे का? हे वाचताना थोडं विचित्र वाटेल, पण असे अनेक प्राणीप्रेमी लोक आहेत जे घरात साप, अजगरसारखे भयानक प्राणी पाळताना दिसतात. त्यांना अगदी लहान मुलांप्रमाणे अंगाखांद्यावर खेळवतात, जे पाहताना तुम्हालाही भीती वाटेल. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक लहान मुलगी सुटकेसमध्ये चक्क महाकाय अजगरांना अंगावर घेऊन झोपली आहे. अजगरांचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओमध्ये लहान मुलगी अजगर जणू काही खेळणी आहेत अशाप्रकारे त्यांच्याबरोबर खेळतेय. व्हिडीओत पाहू शकता, एक सहा-सात वर्षांची मुलगी अंगावर चार ते पाच भलेमोठे अजगर घेऊन सुटकेसमध्ये आरामात झोपली आहे. अजगराला हात लावतानाही अनेकदा भीती वाटते, पण ही मुलगी मात्र न घाबरता अजगरांना अंगावर खेळवतेय. त्यांना घरातील सदस्यांप्रमाणे वागवत आहे.
या मुलीचे नाव एरियाना असे आहे. ती बॉल पायथन जातीच्या अजगरांसह खेळतेय आणि सुटकेसमध्ये त्यांना घेऊन झोपत मस्ती करतेय. तिच्या अंगावर एक-दोन नाही तर अनेक अजगर आहेत.
या व्हिडीओमध्ये एरियाना लिहिते की, मी माझ्या बॉल पायथनसह अशा प्रकारे प्रवास करते. ते खूप सुरक्षित आणि आरामदायी आहेत. लहान प्रवास असो किंवा लांबचा, मी खात्री करते की, माझ्या अजगरांची चांगली काळजी घेतली जात आहे.