पोटापाण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही काम करत असतो. करोना संकट आणि लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काही जणांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. यासाठी काही जण नवीन कामाच्या शोधात आहेत. अशात काही कामं अशी असतात की ती दुसरं कुणी करण्यासाठी पुढे येत नाही. दोन हजार फुटांवर चढून रेडिओ स्टेशनचा बल्ब बदलणं हे त्यापैकी एक. हे काम करणं म्हणजे मृत्यूचा दारात जाण्यासारखं आहे. रेडिओ स्टेशनवर चढून बल्ब बदलणाऱ्या व्यक्तीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
रेडिओ टॉवरवरील बल्ब बदलण्यासाठी १७०० ते २००० हजार फुटांवर चढावं लागतं. कुठे कुठे ही उंची ढगांच्या वर असते. त्यामुळे असं काम न केलेलंच बरं असा विचार मनात येतो. काम जोखमीचं असल्याने अशा कामांसाठी गिर्यारोहक किंवा टॉवर अभियंत्यांची निवड केली जाते. टॉवरवरील उपकरणांची देखभाल, परीक्षण आणि दुरूस्तीसाठी जबाबदारी या व्यक्तींवर असते. दुर्घटना टाळणयासाठी आणि सुरक्षेसाठी ते फक्त हार्नेसचा वापर करतात. कारण खाली पडल्यास मृत्यू होण्याची शक्यता असते. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सुरक्षेचे नियम पाळूनच काम करावं लागतं. रेडिओ टॉवर उंची व्यतिरिक्त असं काम करणाऱ्या व्यक्तींना वारा आणि सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करावा लागतो. हा व्हिडीओ पाहिल्या तुम्हाला त्याची जाणीव होईल.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहीला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी अशी नोकरी नकोच अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.