Rahul Gandhi in J&K: लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान स्थानिकांशी ते संवाद साधत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर झाल्यापासून तिथे प्रचारासंदर्भात राहुल गांधी व काँग्रेसचे अनेक नेते कार्यक्रम घेत आहेत. राहुल गांधींनी स्थानिकांशी साधलेल्या अशाच एका संवादात काश्मीरमधील महिलांनी त्यांना त्यांच्या लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी राहुल गांधींनी दिलेल्या मिश्किल उत्तरानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.

राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये काही काश्मिरी युवतींशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये शिक्षण, रोजगार, राजकारण व विवाह अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता. सोमवारी राहुल गांधींनी या चर्चेचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला. यातला एक शॉर्ट त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यात या विद्यार्थिनी त्यांना लग्नाबाबतचं मत विचारत असताना दिसत आहेत. काश्मीरमध्ये विवाहाचं महिलांवर किती दडपण असतं? अशी विचारणा राहुल गांधींनी केली असता त्यावरून त्यांचा पुढील संवाद झाला. ‘लग्नाच्या दडपणाचं काय? ऐका काश्मीरमधल्या या तरुणांचं काय म्हणणं आहे’, अशी कॅप्शन राहुल गांधींनी या व्हिडीओबरोबर दिली आहे.

“तुमचं लग्नाबाबत काय मत आहे?”

त्यातील एका विद्यार्थिनीनं राहुल गांधींना त्यांचं लग्नाबाबतचं मत विचारलं, तेव्हा राहुल गांधींनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. “लग्नाचा दबाव? मी गेल्या २०-३० वर्षांपासून लग्नाचं दडपण लांब ठेवण्यात यशस्वी ठरलो आहे. पण मला वाटतं ती एक चांगली गोष्ट आहे”, असं राहुल गांधी म्हणाले. त्याचवेळी “तुमचं लग्न करण्याचं नियोजन आहे का?” असा पुढचा प्रश्न विद्यार्थिनींनी विचारला असता त्यावरही राहुल गांधींनी उत्तर दिलं.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी घरातील नव्या सदस्याबरोबरचे सुंदर Photo केले शेअर; म्हणाले, “आईची लाडकी…”

“हो. म्हणजे मी त्यासाठी काही वेगळं नियोजन करत नाहीये. पण जर ते घडलं तर ती एक चांगली गोष्ट आहे”, असं राहुल गांधी म्हणाले. ‘सर प्लीज आम्हालाही आमंत्रित करा’, या विद्यार्थिनींच्या मागणीवरही राहुल गांधींनी “हो हो.. मी नक्की करेन”, असं उत्तर दिलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लग्न मला भीतीदायक वाटतं”

दरम्यान, यावेळी त्यातीलच एका तरुणीनं लग्न भीतीदायक वाटत असल्याचं म्हटलं. “मी फक्त २१ वर्षांची आहे. माझं आयुष्य एन्जॉय करते आहे. मला आणखी मोठं व्हायचंच नाहीये. ते फार भीतीदायक आहे”, असं ती म्हणाली. “मी गेल्या वेळी जेव्हा आमच्या कोर्ट डायरीसाठी न्यायालयात गेले होते, तेव्हा मी पाहिलं की काश्मीरमधील घटस्फोटाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. त्यामुळे घटस्फोटापेक्षा लग्न न करणंच चांगलं”, असं दुसऱ्या एका विद्यार्थिनीनं म्हटलं.