नोटाबंदीच्या निर्णयाला दीड महिना उलटला आहे. या निर्णयावरून सतत काँग्रेसने सरकारवर सडकून टीका केली आहे. मोदींच्या या निर्णयानंतर अनेकदा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले. अशातच सातत्याने रोज नवनवे नियम लागू करण्यात येत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेला टीकेचे लक्ष्य केले आहे. बुधवारी सकाळी राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक फोटो टाकत सरकारच्या या गोंधळात टाकणा-या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
वाचा : नोटा भरण्यास उशीर झाला कारण…; योगेंद्र यादव यांचे स्पष्टीकरण सोशल मीडियावर व्हायरल
नोटांबदीच्या निर्णयावरून एक दिवसापूर्वीच राहुल गांधी यांनी मोदी आणि रिझर्व्ह बँकवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी कपडे बदलतात तसे रिझर्व्ह बँक नियम बदलत आहे, असा उपरोधिक टोला राहुल यांनी हाणला होता. ‘पंतप्रधानांनी देशाला वचन दिले होते की ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये पैसे टाकता येतील, पण आता नियम बदलला, पंतप्रधानांच्या शब्दाला वजन असायला हवे, पण त्यांनी १२५ वेळा नियम बदलले. त्यामुळे पंतप्रधानांचे आश्वासन पोकळ ठरले आहे, असे राहुल यांनी म्हटले’ होते. अशातच त्यांनी लंडनमधल्या ‘ट्रॅफिट लाईट ट्रीचा’ फोटो शेअर करत सध्या सरकार असेच गोंधळात टाकणारे आदेश देत असल्याचा उपहासात्मक टोला हाणला आहे. या ट्रॅफिक लाईट ट्रिवर शंभर सूचना आहेत. जरी ही ट्री शोभेची वस्तू असली तरी त्यावरच्या सूचना गोंधळात पाडण्यासारख्याच आहे. सरकारचे नोटाबंदीनंतरचे नियमही गोंधळात पाडण्यासारखे आहेत असे राहुल गांधीनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
Government orders after demonetisation: pic.twitter.com/5D5p0XX4MO
— Office of RG (@OfficeOfRG) December 21, 2016