भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटचा सामना होऊन चार दिवस उलटले असली तरी यासंदर्भातील वाद, चर्चा अजूनही सुरुच आहेत. असाच एक वाद देशभरामध्ये चर्चेत आहे तो म्हणजे, राजस्थानमधील उदयपूर येथील एका खासगी शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे गेल्याचा. २४ ऑक्टोबर रोजी म्हणजे, रविवारी रात्री टी २० विश्वचषक स्पर्धेत झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यानंतर या शिक्षिकेने व्हॉट्सअपवर पाकिस्तानच्या विजयाबद्दल एक स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळेच तिला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. मात्र आता या शिक्षिकेने नोकरी गेल्यानंतर नक्की काय घडलं होतं यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

प्रकरण काय?
राजस्थानमध्ये व्हॉट्सअप स्टेटसचं कारण देत कामावरुन निलंबित करण्यात आलेल्या आलेल्या शिक्षिकेचं नाव नफीसा अटारी असं आहे. नफीसा या उदयपूरमधील नीरजा मोदी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. पाकिस्तानकडून भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर नफीसा यांनी स्टेटसवर टीव्हीवर सामना पाहतानाच फोटो ठेवला होता. या फोटोला त्यांनी ‘जीत गये… वी वोन’ अशी कॅप्शन दिली होती. या फोटोमध्ये रिझवान आणि बाबर आझमचा फोटो दिसत आहे.

शाळेने काय निर्णय घेतला?
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी शाळेने त्यांना नोकरीवरुन काढत असल्याचं पत्रक जारी केलं आहे. नीरजा मोदी स्कूलच्या शिक्षिका नफीसा अटारी यांना सोजतिया चॅरिटेबल ट्रस्टच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार नीरजा मोदी स्कूलमधून तात्काळ स्वरुपाने नोकरीवरुन काढून टाकण्यात येत आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे. या पत्रावर चेअरमनची स्वाक्षरी आहे.

स्टेटस झालं व्हायरल…
नफीसा यांनी ठेवलेल्या या स्टेटसवर एका विद्यार्थ्याच्या पालकांनी रिप्लाय करुन तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देताय का असं विचारलं असता त्यांनी होय असं उत्तर दिलं. त्यानंतर नफीसा यांनी ठेवलेल्या स्टेटसचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाला आणि ही शाळा चालवणाऱ्या ट्रस्टच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीत नफीसा यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

नफीसा यांनी दिलं स्पष्टीकरण
आता हे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आल्यानंतर नफीसा यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये नफीसा यांनी, “सामना सुरु असताना आम्ही घरातच दोन टीम बनवल्या होत्या. आम्ही आमच्या आमच्या या ठरवलेल्या टीमला पाठिंबा देत होतो. मात्र याचा असा अर्थ नव्हता की मी पाकिस्तानला पाठिंबा देत होते. कोणीतरी मला मेसेज केला की तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा देता का?, त्यांनी मेसेजमध्ये पुढे इमोजी वापरले होते. त्यामुळे मी सुद्धा मस्करीमध्ये हो उत्तर दिलं,” असं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वांची माफी मागते…
“मी एक भारतीय आहे. मी भारतावर तेवढंच प्रेम करते जेवढं तुम्ही लोक करता. मी पाकिस्तानचं समर्थन करत नाही. मला स्टेटस ठेवल्याची चूक नंतर लक्षात आल्यावर मी ते लगेच रात्रीच डिलीट केलं. चुकीच्या पद्धतीने अर्थ घेतला जात असल्याचं समजल्यानंतर मी ते काढून टाकलं. मी तुम्हा सर्वांची माफी मागते,” असं नफीसा म्हणाल्या आहेत.