तो बघा ‘अंकल टॉय’ आला ! कोणतरी असे ओरडले की सर्व मुले धावत ‘अंकल टॉय’कडे जातात. आपल्या पिशवीतून एक एक खेळणं काढून या लहान मुलांच्या हातात ठेवत ‘अंकल टॉय’ या निरागस, निष्पाप चेह-यावरचा आनंद डोळ्यात साठवत निघून जातो, दूर देशात त्यांच्यासाठी पुन्हा खेळणी आणण्याकरता. जरी लहान मुलांसाठी तो ‘अंकल टॉय ‘ असला तरी त्याला ‘सिरियाचा टॉय स्मगलर’ म्हणजे ‘खेळण्यांची तस्करी’ करणारा तस्कर म्हणून सारे जग ओळखते. कालपरवापर्यंत सिरयाच्या नागरी युद्धात आई-वडील मारल्या गेलेल्या निष्पाप मुलांनाच फक्त तो माहित होता. आज सा-या जगाला तो माहित झाला आहे.
सहा मुलांचा पीता असलेला रामी अदहम गेल्या चार वर्षांपासून सिरियातल्या लहान मुलांसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता खेळणी घेऊन येतो. सिरियात नागरीयुद्ध सुरु आहे. आयसिसच्या दहशतीने सारा देश उद्धवस्त झाला. ज्यांना शक्य होते ते जीव मुठीत घेऊन शेजारच्या देशांत आश्रयासाठी पळाले पण काही मात्र तिथेच राहिले. आज मोठ्या संख्यने लहान मुले सिरायात असून, अनेक मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. या अनाथ मुलांसाठी खेळणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू आणण्याचे काम रामी करतो. फिनलँड देशांतून तो मुलांसाठी खेळणी आणतो. गेल्या चार वर्षांत जवळपास २८ वेळा फक्त खेळणी आणण्यासाठी तो त्या देशात गेला आहे. फिनलँडमधून खेळणी जमा केल्यानंतर तो तुर्कीमध्ये विमानाने येतो आणि तिथून त्याचा सिरियात जाण्याचा पायी प्रवास सुरू होतो. प्रत्येक खेपेला ८० किलो खेळण्यांचे वजन आपल्या खांद्यावर वाहत पायी १६ तासांचा प्रवास करत तो सिरियात येतो. सिरियामधील जीवघेण्या परिस्थितीची पर्वा न करता केवळ या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहाण्यासाठी तो स्वताचा जीव धोक्यात घालतो. या चांगल्या कामसाठी क्वचित प्रसंगी त्याचे मित्रदेखील त्याला मदत करतात. फिनलँडमधील काही लोक स्वखुशीने आपल्याकडील खेळणी रामीला देतात.
सिरियातील लहान मुले सतत युद्धाच्या छायेत वावरत असून, येथील शाळा कधीच बंद झाल्या आहेत. या मुलांकडे दुसरा काहीच विरंगुळा नसल्याने निदान खेळणी देऊन त्यांच्या चेह-यावर हसु आणावे हा एकमेव हेतू मनात ठेवून रामी स्वताचा जीव धोक्यात टाकतो.