Young Woman With Salary Of Rs 40 Lakhs Expressed Grief On Reddit: खूप पैसे कमवणारा प्रत्येकजण समाधानी असेलच असे नसते. कारण वर्षाला ४० लाख रुपये कमावणारी ३४ वर्षीय तरुणीने मांडलेल्या तिच्या व्यथेमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर तिने कबूल केले आहे की, तिच्या नोकरीमुळे ती इतकी थकते की, काम सुरू करण्यापूर्वी ती अनेकदा रडते. कागदावर आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि यशस्वी असूनही, तिने कबूल केले की १२ वर्षे सतत काम करत असल्यामुळे तिला थकवा जाणवत आहे आणि आता ती थांबण्याची वेळ आली आहे का? याचाही विचार करू लागली आहे.

तणावाचा आरोग्यावर परिणाम

रेडिटवर अनुभव सांगताना, या तरुणीने सांगितले की, तिला ४० लाख रुपये वार्षिक पगार असून, एका कंपनीत अ‍ॅनालिटिकल लीड म्हणून काम करते परंतु तिला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवा जाणवत आहे. ती म्हणाली की, “मी काम सुरू करण्यापूर्वी रडते”. यावेळी तिने कबूल केले की, या ताणतणावाचा तिच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. आजापर्यंत तिला तिच्या आरोग्याला प्राधान्य देता आलेले नाही.

पुन्हा त्याच पगाराची नोकरी मिळेल का?

वर्षअखेर जवळ येत आहे, जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुमारास भरती प्रक्रिया सुरू होते त्यामुळे ती ३-४ महिन्यांचा करिअर ब्रेक घेण्याचा विचार करत आहे. पण यामध्येही समस्या आहेत. तिच्यावर आर्थिक जबाबदारी आहे आणि ती उत्पन्नाशिवाय फक्त सहा महिनेच काम करू शकते. तिला सर्वात मोठी चिंता आहे की, या ब्रेकमुळे तिला सध्याचा पगार पुन्हा मिळवण्याच्या शक्यता कमी होतील का?

दीर्घ कारकिर्दीतील धकाधकीचे आयुष्य

या पोस्टमध्ये तरुणीने तिच्या दीर्घ कारकिर्दीतील धकाधकीबद्दलही सांगितले. ती गेल्या १२ वर्षांपासून सतत काम करत आहे आणि या कालावधीत तिला कधीही ब्रेक घेता आला नाही. “करिअरमधील अडचणी सामान्यतः कशा समजल्या जातात हे जाणून घ्यायला मला आवडेल. त्याचा पगाराच्या वाटाघाटींवर किंवा पुन्हा नोकरी मिळवण्याच्या संधींवर परिणाम होतो का?” असे प्रश्नही तिने या पोस्टमध्ये विचारले आहेत.

स्वतःला दुःखात ढकलण्यापेक्षा…

या पोस्टनंतर तिला अनेक युजर्सनी मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित केले. काहींनी असेही म्हटले की, स्वतःला दुःखात ढकलण्यापेक्षा विश्रांती घेणे चांगले. काहींनी दैनंदिन खर्च कमी करण्याचा सल्ला दिला जेणेकरून तिची बचत जास्त काळ टिकेल आणि मोठा ब्रेक घेता येईल, तर काहींनी तिला आठवण करून दिली की, काम हे जीवनाचा फक्त एक भाग आहे, जगण्याचे कारण नाही.