Reddit Post Of Dharavi Man Who Earned Rs. 4 Crore Profit From Share Market: धारावीत जन्मलेल्या एका ३४ वर्षीय तरुणाने नुकतेच रेडिटवर त्याच्या शेअर बाजारातील यशाचा अनुभव शेअर केला आहे. या तरुणाने त्याच्या भूतकाळातील प्रतिकूल परिस्थितीवर भाष्य करताना पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी धारावीत जन्मलो आणि तिथेच लहानाचा मोठा झालो. महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले, जिथे माझे काही वर्गमित्र ७वी पर्यंत त्यांचे नाव लिहू शकत नव्हते.”
धारावी ते आर्थिक स्वातंत्र्य
या तरुणाने अनेक आव्हाने असूनही शैक्षणिकदृष्ट्या सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्याच्या पोस्टनुसार, त्याने दहावीपर्यंत वर्गात नेहमी पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवले होते. ११वीमध्ये विज्ञान शाखा निवडल्यामुळे त्याला इंग्रजी विषयाकडे वळावे लागले, ज्यासाठी सुरुवातीला संघर्ष करावा लागला. “११वी कठीण गेली, पण लवकर सर्व गोष्टी आत्मसात केल्या आणि ८१ टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण झालो”, असे त्याने लिहिले. या यशामुळे त्याला मुंबईतील एका चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि त्यानंतर ३.६ लाख वार्षिक पगाराची नोकरीही मिळाली.
फक्त एका शेअरने सुरू केला गुंतवणुकीचा प्रवास
२०१५ मध्ये या तरुणाने एसबीआयच्या फक्त एका शेअरने गुंतवणुकीचा प्रवास सुरू केला. “पहिल्या चार वर्षांत मी काहीच पैसे बचत करू शकलो नाही. पण कोविडनंतर परिस्थिती बदलली. २०२१ मध्ये मला ५० लाख रुपये वार्षिक पगाराची नोकरी मिळाली आणि आक्रमकपणे गुंतवणूक करायला सुरुवात केली. २०२२ मध्ये मी पहिल्यांदा एक कोटी रुपये परतावा मिळवला आणि आज तो परतावा ४ कोटी रुपये झाला आहे. गेली वर्षभर कोणतीही नोकरी न करता आणि कुटुंबातील दोन लग्नांसाठी आर्थिक मदत करूनही, मी इतका मोठा टप्पा पार करू शकलो”, असे त्याने सांगितले.
संपत्ती निर्माण करण्यासाठी सातत्य आणि संयमाचे महत्त्व
रेडिट पोस्टमध्ये या तरुणाने संपत्ती निर्माण करण्यासाठी सातत्य आणि संयमाचे महत्त्व सांगितले आहे. तो म्हणाला, “मला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे की नाही हे खात्रीने सांगता येणार नाही. पण हे नक्की सांगू शकतो की, आर्थिक स्थैर्यामुळे जीवनातील अनेक निर्णय घेणे सोपे होते. मी ५० लाख रुपयांपेक्षा जास्त पगाराची नोकरी सोडली, एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि पुन्हा ५० लाखांहून अधिक पगाराची नोकरी मिळवली. मला वाटते की आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सातत्य आणि वेळ महत्त्वाची असते.”