Reddit Post Of UPSC Aspirant: एका २७ वर्षीय यूपीएससी उमेदवाराची रेडिट पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने परीक्षेच्या तयारीमागील वास्तविक जीवनातील आव्हानांवर भाष्य केले आहे. या रेडिट युजरने शेअर केलेली ही पोस्ट नोकरी आणि अभ्यासात संतुलन राखण्याचा संघर्ष करत असलेल्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससीची तयारी करताना आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी या तरुणाने अमेरिकेतील आयटी कंपनीमध्ये नोकरी कशी स्वीकारली, हे त्याने पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करून, त्याने पैसे कमवल्याचे आणि दिवसा अभ्यास केल्याचेही त्याने पोस्टमध्ये सांगितले आहे.
या तरुणाला सुरुवातीला एकाच वेळी नोकरी आणि अभ्यासाचे संतुलन साधता येईल असे वाटले होते. तो नोकरीच्या वेळी ब्रेकदरम्यानही अभ्यास करत असे, थकलेला असतानाही चालू घडामोडी वाचत असे आणि सातत्य राखण्याचा प्रयत्न करत असे. पण कालांतराने या सर्व गोष्टी आणखी कठीण होत गेल्या, असे त्याने रेडिट पोस्टमध्ये नमूद केले आहे.
पोस्टमध्ये हा तरुण पुढे असेही नमूद करतो की, परिस्थिती हाताळण्यासाठी त्याने अनेक वेळा कंपन्या बदलल्याचं असूनही दबाव कमी झाला नाही. जेव्हा त्याने यूपीएससीच्या तयारीसाठी जास्त वेळ दिला, तेव्हा त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि अखेर त्याला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला.
“आता मी अधांतरी आहे. नोकरी नाही, उत्पन्न नाही आणि ही परीक्षा? यूपीएससी परीक्षा अजूनही माझ्या मनात आहे. मला अजूनही ही परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. पण जेव्हा तुमचं जीवन अस्थिर वाटतं, तेव्हा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण असतं,” असे त्या तरुणाने रेडिट पोस्टमध्ये म्हटले आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर असंख्य प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या तरुणाला पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. याचबरोबर काहींनी काम आणि अभ्यासाचे संतुलन राखण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे अनुभवही शेअर केले.
एका युजरने म्हटले की, “मी जानेवारीमध्ये माझी सरकारी नोकरी सोडली कारण मला अपयशाचे कोणतेही कारण नको होते. आता या परीक्षेची अनिश्चितता लक्षात घेता, मला वाटते की नोकरी सोडली नसती तर बरे झाले असते.”
काहींनी स्थिर उत्पन्नाशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याबाबत चिंता व्यक्त केली, तर बहुतेकांनी त्याच्या दृढनिश्चयाचे आणि अडचणींना न जुमानता पुढे जाण्याच्या इच्छेचे कौतुक केले.