ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर ऑर्डर केलेल्या सामानाऐवजी भलतीच एखादी वस्तू आल्याच्या घटना नेहमी समोर येत असतात. सामान्य व्यक्तींसोबत अशाप्रकारची घटना म्हणजे तर नित्याचीच बाब आहे. पण, आता एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासोबत अशीच फसवणुकीची घटना घडलीये.

अभिनेता रोनित रॉय यांच्या मुलाने प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवरुन ‘प्ले-स्टेशन 4’ साठी (PS4) ‘जीटीए-5’ या लोकप्रिय गेमची सीडी ऑर्डर केली. पण, ऑर्डर आल्यानंतर बॉक्समधून गेमच्या सीडीऐवजी केवळ कोरा कागद निघाला. यानंतर रोनित रॉय यांनी व्हिडिओ शेअर करुन अ‍ॅमेझॉनकडे तक्रार केली आणि तातडीने दखल देण्याची मागणी केली. “प्रिय अ‍ॅमेझॉन, माझ्या मुलाने पीएस4 साठी जीटीए5 या गेमची सीडी ऑर्डर केली होती. पण, पॅकेजमध्ये सीडीऐवजी फक्त एक कोरा कागदाचा तुकडा आहे. कृपया तातडीने लक्ष द्या, असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं. त्यानंतर अन्य एका ट्विटमध्ये ऑर्डर नंबरही शेअर करत त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या सेवेविषयी संताप व्यक्त केला. रोनित रॉयने  शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक नकाशा, एक बुक-टू-बुकलेट, एक रिकामी डिस्क केस आणि कोरा कागद दिसतोय.

रोनित रॉयकडून तक्रार येताच अ‍ॅमेझॉनने त्याची तातडीने दखल घेत ट्विटरवर त्यांना रिप्लाय दिला. “तुम्हाला आलेल्या अप्रिय अनुभवाबद्दल आम्ही माफी मागतो. याचा आम्ही तपास करु”, असं उत्तर अ‍ॅमेझॉनने दिलं आहे.


दरम्यान, सोशल मीडियावर रोनित रॉय यांनी शेअऱ केलेला व्हिडिओ व्हायरल होत असून अनेक नेटकरी आपल्या अशाच काही अनुभवांबद्दल सांगत आहेत.