मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे तमाम भारतीय क्रिकेट रसिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. सचिन म्हणजे क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईतच. मात्र, आता सचिन तेंडुलकरचा एक डीपफेक व्हिडीओ समोर आला असून त्याद्वारे सचिन तेंडुलकरच्या तोंडी ऑनलाईन गेमिंग अ‍ॅपच्या प्रमोशनची वाक्य टाकण्यात आली आहेत. एकीकडे रश्मिका मंदानापासून अनेक बॉलिवुड अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत असून आता त्यात सचिन तेंडुलकरच्या व्हिडीओचीही भर पडली आहे!

काय आहे व्हिडीओमध्ये?

सचिन तेंडुलकरनं स्वत:च हा व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर केला असून त्यामध्ये आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये एका ऑनलाईन गेमिंग अॅपच्या प्रमोशनबाबतची वाक्य सचिन तेंडुलकर स्वत: म्हणत असल्याचं दाखवण्यात आहे. शिवाय यात सचिन तेंडुलकर त्याची मुलगी साराचाही उल्लेख करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

“माझी मुलगी यावेळी एविएटर ही गेम खेळतेय, ज्याविषयी प्रत्येकजण सध्या बोलतोय. वो स्कायवर्ड एविएटर क्वेस्ट अ‍ॅप खेळून दररोज एक लाख ८० हजार रुपये कमावते. मला कधीकधी आश्चर्य वाटतं की हल्ली चांगला पैसा कमावणं किती सोपं झालं आहे. सगळ्यात विशेष बाब म्हणजे हे अ‍ॅप अगदी मोफत आहे. कुणीही आयफोनधारक ते डाऊनलोड करू शकतो”, अशी वाक्य व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकरच्या तोंडी टाकण्यात आली आहेत.

व्हिडीओ Deepfake!

दरम्यान, हा व्हिडीओ डीपफेक असल्याचं अल्पावधीतच स्पष्ट झालं आहे. व्हिडीओमधील संवाद हे सचिनच्या आवाजात नसल्याचं लागेच लक्षात येत असून त्याच्या ओठांच्या हालचालीही शब्दांनुसार होत नसल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात खुद्द सचिन तेंडुलकरनं एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच, अशा व्हिडीओंवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यानं लोकांना केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हा व्हिडीओ बनावट आहे. तुम्हाला फसवण्यासाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे गैरवापर अत्यंत चुकीचा आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की असे व्हिडीओ, अ‍ॅप किंवा जाहिराती तुम्हाला कुठे दिसल्या, तर त्याविरोधात तातडीने तक्रार दाखल करा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सलाही यासंदर्भात सतर्क राहणं आवश्यक आहे. अशा प्रकारांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींवर या साईट्सकडून तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे. या प्रकारांबाबत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. जेणेकरून अफवांना आवर घालता येईल आणि डीपफेकसारख्या प्रकारांचा गैरवापर संपवून टाकता येईल”, अशी सविस्तर पोस्ट सचिन तेंडुलकरनं त्याच्या अकाऊंटवर पोस्ट केली आहे.