तुम्ही रस्त्याने जात असताना अचानक बाजूला एक गाडी उभी राहावी आणि आतून खुद्द क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं तुम्हाला ‘विमानतळाकडे जाणारा रस्ता कुठला?’ असा प्रश्न विचारला तर? साक्षात सचिन तेंडुलकर आपल्या बाजूला येऊन उभा राहिल्यावर आपली जशी अवस्था होईल, तशीच काहीशी अवस्था सचिननं शेअर केलेल्या एका व्हिडीओतल्या चाहत्याची झाल्याचं दिसत आहे! हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी सचिननं त्याच्या पोस्टमध्ये काही म्हटलेलं नाही. मात्र, चाहत्यांच्या या प्रेमामुळेच आपलं आयुष्य इतकं स्पेशल झालंय, असं मात्र सचिननं या पोस्टमध्ये आवर्जून नमूद केलं आहे.

काय आहे या व्हिडीओमध्ये?

सचिन तेंडुलकरनं त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात रस्त्यावरून आपल्या स्कूटीवर जाणाऱ्या एका चाहत्याला थांबवून सचिननं त्याच्याशी संवाद साधल्याचं दिसत आहे. या चाहत्याचं नाव हरीश कुमार असून सचिन तेंडुलकरनं त्याच्याकडच्या फोटोसंग्रहावर सहीदेखील दिली. ‘तेंडुलकर १०..आय मिस यू’ असं लिहिलेला मुंबई इंडियन्सचा एक टीशर्ट या चाहत्यानं घातला होता. सचिननं आपली कार त्याच्याबाजूला थांबवत त्याच्याशी संवाद साधला. शिवाय हेलमेट घालून गाडी चालवल्याबद्दल सचिननं हरिश कुमारचं कौतुकही केलं.

“माझा विश्वास बसत नाहीये की सचिन तेंडुलकरशी मी बोलतोय. आज मला माझ्या देवाचं दर्शन झालं. आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे”, असं हरिश कुमार व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

‘मास्टरब्लास्टर’ला पडली ‘जुनाबाई’ ची भुरळ, तिच्या तिन्ही पिढ्या पाहिल्याचा अभिमान

विक्रमवीर सचिन!

सचिन तेंडुलकर आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी त्याचा चाहतावर्ग अजूनही सचिनवर तेवढंच प्रेम करतो. सचिननं केलेली ऐतिहासिक कामगिरी क्रिकेटच्या पुस्तकांमध्ये नमूद झाली आहे. आपल्या कारकिर्दीत सचिननं एकूण ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. ६६४ सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. आजपर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सचिन तेंडुलकरला भेटला! जेव्हा मी माझ्यावरचं चाहत्यांचं एवढं प्रेम पाहातो, तेव्हा माझं मन आनंदानं भरून येतं. अतिशय अनपेक्षितपणे अशा प्रकारे चाहत्यांचं प्रेम व्यक्त होतं. यामुळेच माझं आयुष्य फार स्पेशल होऊन जातं”, अशा भावना सचिननं हा व्हिडीओ शेअर करताना व्यक्त केल्या आहेत.