मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानासारखाच सोशल मीडियावरही सक्रिय असतो. सामाजिक हेतूने कधी आव्हान, तर कधी इतर खेळाडूंना चॅलेंज देताना दिसतो. तसेच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासही विसरत नाही. करोना काळातही सचिन तेंडुलकर यांनी एकमेकांना मदत करण्याचं आव्हान केलं होतं. प्लाझ्मासाठी त्यांनी स्वत: पुढाकार घेतला होता. मात्र सध्या सचिन तेंडुलकर यांचं एक ट्वीट चर्चेत आहे. या ट्वीटमधून त्यांनी वाहतूक पोलिसाचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर यांच्या मित्राला एका वाहतूक पोलिसाने मदत केली होती. वाहतूक पोलिसाने अपघात झालेल्या मित्राचा जीव वाचवला होता. त्यानंतर योग्य उपचारांमुळे त्यांचा मित्र आता बरा होत आहे.
सचिन तेंडुलकर यांनी ट्वीट करत लिहीलं आहे की, “वेळीच समजूतदारपणा दाखवत वाहतूक पोलिसांनी त्याच्या जखमी मित्राला ऑटोच्या मदतीने रुग्णालयात नेले. यादरम्यान अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या मणक्याला आणखी इजा होणार नाही याचीही खबरदारी घेतली होती.”
पोलीस कर्मचाऱ्याला भेटलो आणि मदत केल्याबद्दल आभार मानल्याचंही सचिन तेंडुलकर यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढे लिहिले की, “जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या मदतीसाठी पुढे येतात. अशा लोकांमुळे हे जग खूप सुंदर आहे.” निस्वार्थ भावनेने इतरांची सेवा करणारे असे लोक दिसले तर त्यांचे आभार मानायला विसरू नका, असे आवाहन सचिन तेंडुलकर यांनी पुढे केले आहे.