साधारण दहा वर्षांपूर्वी पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी ‘जर लता मंगेशकर यांना पाकिस्तानमध्ये पाठवलं तर आम्ही काश्मीर स्वखुशीने भारताला देऊ’ असं म्हटलं होतं. आता त्याच धर्तीवर आमिर खान आणि सलमान खानला पाकिस्तानमध्ये पाठवण्यात यावं असा खासमखास संदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नरेंद्र मोदींना पाठवला आहे.
पण यावेळची स्थिती थोडी वेगळी आहे म्हणतात. पाकिस्तानमध्ये नवाज शरीफांपेक्षा आमिर खान आणि सलमान खान यांचीच लोकप्रियता जास्त असल्याने त्यांना नवाज शरीफांनी बोलावलं आहे. त्यात अक्षय कुमारला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने हे दोघे नाराज असल्याचं कळतंय. तेव्हा त्यांची समजूतही नवाझ शरीफ काढणार असल्याचं सांगितलं जातंय. पाकमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष ही पदं मोठी असली तरी लष्कराकडेच सगळ्या गोष्टींचं ‘श्रेय’ जातं. त्याप्रमाणेच पुरस्काराचं श्रेय कोणालाही मिळालं तरी इंडस्ट्रीमधली मोठी स्थानं तुमच्याकडेच असल्याचं नवाझ शरीफ या दोघांना सांगणार आहेत.
पण या दोघांची नाराजी दूर खूप मोठी आहे म्हणे. म्हणजे सेना-भाजप मधले याआधी होणारे रूसवेफुगवेसुध्दा फिके पडतील एवढी मोठी. परफेक्शनिस्ट आमिर खानला यावर्षी नामांकन असतानाही राष्ट्रीय पुरस्कार न मिळाल्याने तो पऱफेक्टली रागावलाय. आणि सलमानसारख्या ‘बाॅक्स आॅफिस चँपियन’ला तर नामांकनच नव्हतं. त्यामुळे पुरस्कार न मिळाल्याबाबत रागावण्यासारखं त्याच्या बाबतीत काहीच घडलेलं नाही. पण सतत रागात राहण्याची त्याची सवयच असल्याने तो काहीशा घुश्श्यातच ‘लाँग ड्राईव्ह’ला निघून गेलाय. रिलॅक्सेशनसाठी त्याने चंकी पांडेकडून अभिनयाचे धडे घेण्याचं आता ठरवलंय.
आपल्याकडे अनेकदा फिल्मी सितारे त्यांचं करिअर उतरणीला लागल्यावर राजकारणात उतरतात तसं सलमान आणि आमिरला नवाझ शरिफांकडून आॅफर असल्याचं म्हटलं जातंय. नवाझ शरीफ त्यांच्या पक्षातर्फे या दोघांना निवडणुकांमध्ये उभे करणार आहे. या दोघांपैकी कोणी पंतप्रधान झालं की शरीफांचा पाकचे राष्ट्राध्यक्ष व्हायचा मार्ग मोकळा. मोठ्या पदांच्या बाबतीत आपली गत लालकृष्ण अडवाणींसारखी होऊ नये यासाठी नवाझ प्रयत्नशील आहेत. स्वत:ला ‘श्रध्देय नवाझ शरीफजी’ म्हणवून घेण्यात त्यांनी काहीएक रस नाही.
त्यातही आमिर खानने पाकिस्तानमध्ये फेरफटका मारूनच यायचं ठरवलं होतं. पण त्याच्या जिओ मोबाईलला भारतातच पुरेशी रेंज मिळत नसताना पाकिस्तानमध्ये काय होणार या धसक्याने त्याने आपला प्लॅन कॅन्सल केलाय.
आता आमिर, सलमान आणि अक्षय कुमार या तिघांमध्ये दिलजमाई होणार तरी कशी? याबाबत अनेकांकडून अनेक सजेशन्स येत आहेत. यूपीमधल्या निवडणुकांमध्ये मार खाल्यानंतरही योगी आदित्यनाथांच्या शपथविधीला मुलायम आणि अखिलेश जसे स्टेजवर हजर राहिले तसं राष्ट्रीय पुरस्कारांच्या वितरण समारंभाला सगळ्यांच्या देखत या तिघांमध्ये दिलजमाई केली जावी असा प्रस्ताव समोर येत आहे. अक्षय कुमार स्टेजवर गेल्यावर या दोघांनी त्याच्या कानात ‘जय माहिष्मती’ म्हणावं आणि समारंभ उरकल्यावर तिघांनी ‘बाहुबली-२’ च्या शोला जावं असा काही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. शेवटी कटाप्पाने बाहुबलीला का मारलं या राष्ट्रीय गुपिताचा उलगडा झाल्यावर हे तिघे खुश होतीलच.
(हा लेख ‘दिल पे’ न घेण्याचा आहे. गंभीर बातम्या किती वाचायच्या? लाईफ मध्ये विनोदाला आणि कल्पनाशक्तीलाही मोठं स्थान आहे राव)