राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील सरकारी शाळेतील एका विद्यार्थिनीच्या बॅगेत पाण्याच्या बाटलीत लघवी भरल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे. संशयित आरोपीने विद्यार्थिनीच्या बॅगेत एक लव्ह लेटरही ठेवले होते. दुपारच्या जेवणावेळी विद्यार्थिनीने बॅगमधील पाण्याची बाटली उघडली असता लघवीचा वास आल्याने तिला ही धक्कादायक गोष्ट समजली. यानंतर तिने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. मात्र, घृणास्पद घटनेवर शाळा प्रशासनासह स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घालत संताप व्यक्त केला.

यावेळी घटनेतील संशयिताच्या वस्तीत घुसून स्थानिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. यानंतर जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी लाठीचार्ज केला.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी लुहारिया गावातील सरकारी शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तक्रार केली की, शाळेत असताना जेवणाच्या सुट्टीदरम्यान तहान लागल्याने बॅगेतील बाटली उघडली असता तिला लघवीचा वास आला, तेव्हा तिला बाटलीत लघवी भरल्याचे समजले. यावेळी तिने पूर्ण बॅग तपासली तेव्हा लव्ह यू लिहिलेले एक लव्ह लेटरदेखील आढळून आले. याप्रकरणी तिने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली आणि घरी येऊन कुटुंबीयांनी सांगितले.

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी सोमवारी शाळा गाठून पुन्हा तक्रार केली. मात्र, त्यानंतरही मुख्याध्यापकांनी संबंधित संशयिताविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.

तक्रार करूनही मुख्याध्यापकांनी कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त स्थानिकांनी पुन्हा तहसीलदार, लुहारिया पोलिस ठाण्याचे प्रभारी व शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. यानंतरही संशयिताविरोधात कोणतीही प्रभावी कारवाई न झाल्याने संशयिताच्या वस्तीत घुसून दगडफेक केली.

तसेच लुहारियाच्या सरकारी शाळेला ग्रामस्थांनी टाळे ठोकले आणि संशयित विद्यार्थ्याला शाळेतून हाकलून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

या घटनेवर एएसपी घनश्याम शर्मा म्हणाले की, विद्यार्थिनीने अद्याप पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, संशयिताच्या वस्तीत घुसून दगडफेक करणाऱ्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल केल्यास पोलीस योग्य ती कारवाई करतील. सध्या अप्पर पोलिस अधीक्षक घनश्याम शर्मा आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा लुहारिया गावात हजर आहे.