Pune Viral News : पुण्यातल्या पालकांनी एक व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. ज्या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. पुण्याचे गुंतवणूकदार नितीन धर्मावत यांची ही पोस्ट आहे जी चांगलीच चर्चेत आली आहे. अनेक पालक या पोस्टवर मतं मांडत आहेत. विद्येच्या माहेरघरात शिक्षणाच्या नावाने हे काय चाललं आहे असा सवाल धर्मावत यांनी उपस्थित केला आहे.
काय म्हटलं आहे नितीन धर्मावत यांनी?
शाळा बिनकामाच्या आहेत, Useless. माझा मुलगा आठवीत आहे. रात्रीचे १२ वाजले आहेत आणि माझा मुलगा कुठलातरी बिनकामाचा प्रोजेक्ट करतो आहे. आधी त्याला गृहपाठ इतका दिला होता की त्याला हा प्रोजेक्ट जमला नाही. भयंकर भाग हा आहे की त्याने जर हा प्रोजेक्ट तयार केला नाही तर त्याला त्याच्या आवडत्या PE च्या तासाला बसता येणार नाही. बरं ही गोष्ट आजची नाही. रोज तो १२ ते १२.३० वाजेपर्यंत जागतो, रोज सकाळी शाळा असल्याने त्याला लवकर उठावं लागतं. मी या सगळ्याच्या विरोधात असलो तरीही ही शिक्षणपद्धती स्वीकारण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. मी या व्यवस्थेपुढे हतबल आहे. धर्मावत पुढे म्हणाले, पीई म्हणजे फिजिकल एज्युकेशनचा जो तास आहे तो तास त्याला अटेंड करु दिला जाणार नाही अशी भीती माझ्या मुलाला वाटते आहे. अशी पोस्ट धर्मावत यांनी केली आहे. दरम्यान या पोस्टवर आता प्रतिक्रिया उमटत आहेत.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आहेत?
धर्मावत यांनी केलेल्या पोस्टनंतर यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. एक युजर म्हणतो प्रोजेक्ट हे शिक्षणाचं बळकट माध्यम आहे. मुलांना त्यातून एक प्रकारचा अनुभव येतो. यामध्ये मुलांना अभ्यास अत्यंत व्यवस्थितपणे करावा लागतो आणि संशोधन करण्याची संधी मिळते. क्राफ्टवर्क, आर्टवर्क, सर्जनशीलता आणि सादरीकरण हे मुलांना दाखवता येतं. प्रोजेक्ट हा फक्त ग्रेडपुरता मर्यादित नसतो. त्यात बुद्धिमत्तेचा कस लागतो. दुसऱ्या एका युजरने म्हटलंय की तुम्ही बरोबर बोलत आहात. हा सगळा वेळेचा अपव्यय आहे बाकी काहीही नाही. काहींनी धर्मावत यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे तर काहींनी मुलांना तुम्ही वेळेचं नियोजन शिकवा अशा प्रकारचे काही सल्लेही दिले आहेत. एका युजरने म्हटलं आहे अनेकदा शाळा प्रोजेक्ट तयार करायला पुरेसा वेळ देतात. तुमच्या मुलाला असं कसं काय सांगितलं की लगेच प्रोजेक्ट हवा आहे? तर आणखी एका युजरने म्हटलंय शिक्षण क्षेत्रात काय चाललंय हेच कळत नाही. मुलांनी १२ किंवा १२.३० पर्यंत जागं राहणं ही खरोखरच शिक्षा आहे.