अमेरिकेतील जगप्रसिद्ध अशा स्पेलिंग बी स्पर्धेमध्ये यंदा निवडण्यात आलेल्या ११ अंतिम स्पर्धकांपैकी ९ स्पर्धक हे भारतीय वंशाची अमेरिकन मुलं आहेत. मागील २० वर्षांपासून अधिक कालावधीपासून इंग्रजी भाषेसंदर्भातील अमेरिकेतील आघाडीचा क्विझ शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेलिंग बीमध्ये भारतीय वंशाच्या मुलांचा कायमच दबदबा पहायला मिळतो. यंदा मात्र ही संख्या आश्चर्यचकित करणारी आहे.

२०२१ च्या स्प्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी फायनल्समध्ये सहभागी होणाऱ्या ११ जणांपैकी ९ जण हे भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. जुलै ८ रोजी हा अंतिम सामना होणार असल्याची माहिती स्पेलिंग बीच्या आयोजकांनी जारी केलेल्या पत्रकात देण्यात आलीय. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अंतिम स्पर्धक निवडण्यात आले आहेत. या स्पर्धेचा निकाल थेट लागला नाही तर वन पर्सन, वन वर्ड अशा फेऱ्यांच्या माध्यमातून अंतिम विजेता निश्चित करण्यात येईल. फ्लोरिडामधील ओर्लांडोजवळच्या वॉल्ड डिस्नेच्या वर्ल्ड रिसॉर्टमध्ये ईएसपीएन वाईड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अंतिम स्पर्धा खेळवली जाणार आहे. अंतिम स्पर्धा ईएसपीएन टूवरुन लाइव्ह ब्रॉडकास्ट केली जाणार आहे.

नक्की वाचा >> पोलीस, सरकारी अधिकाऱ्यांच्या छळाला कंटाळून गोव्यातील Nightlife ची ओळख असणारा क्लब मालकाने विकला

“२०२१ च्या स्प्रिप्स नॅशनल स्पेलिंग बीच्या अंतिम सामन्यामध्ये पोहचलेल्या स्पर्धांची ओळख करुन देताना आम्हाला आनंद होत आहे. अनेक वेगवेगळ्या राऊण्ड्समध्ये या स्पर्धकांची क्षमता तपासण्यात आली आणि त्यांनी त्यामध्ये बाजी मारली. आता आम्हाला उत्सुकता आहे त्या क्षणाची जेव्हा ही मुलं राष्ट्रीय स्तरावर शब्दकोषालाही आव्हान देत आपली क्षमता सिद्ध करतील,” असं स्पेल बीचे मुख्य निर्देशक डॉक्टर जे. मिशेल ड्रुनिल यांनी म्हटलं आहे.

११ अंतिम स्पर्धकांमध्ये ब्रम्हासमधील १२ वर्षीय रॉय सेलिग्मन, न्यूयॉर्कमधील १३ वर्षीय भावना मदिनी, नॉर्थ कॅलिफॉर्नियामधील १४ वर्षीय श्रीथन गाजुला, व्हर्जेनियामधील १४ वर्षीय अश्रीता गंधारी, इलिनोइसमधील १३ वर्षीय अवनी जोशी, न्यू ऑलर्डंमधील १४ वर्षीय जालीया अवंत, टेक्सासमधील १० वर्षीय विश्वेषा वेदुरु, डेल्समधील १२ वर्षीय ध्रुव भारतीया, टेक्सासमधील १२ वर्षीय विहान सिब्बल, टेक्सासमधील १३ वर्षीय अशयानी कामा आणि सॅन फ्रॅन्सिस्कोमधील १२ वर्षीय चित्रा तुम्माला या स्पर्धकांचा समावेश आहे.

नक्की वाचा >> “आरोग्य मंत्रालयाचं ‘हे’ ट्विट मी आमच्याकडे चहा पिण्यासाठी आलेल्या शेजारच्या काकुंना दाखवलं तर…”

मागील २० वर्षांपासून या स्पर्धेमध्ये अमेरिकन भारतीयांचा दबदबा राहिला असून केवळ १ टक्का स्पर्धक हे अमेरिकन होते. २०२० साली करोनाच्या पार्श्वभूमीवर स्पेल बीने स्पर्धा रद्द केली होती. मात्र २०१९ साली खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत आठ उपविजेते ठरले होते ज्यापैकी सात भारतीय होते. १९९९ पासून या स्पर्धेमध्ये २६ भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलांनी बाजी मारलीय.