प्रियकरासाठी पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याच्या खुणा दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून सीमाला बेदम मारहाण झाल्याचा दावा केला जात आहे. सचिन आणि सीमा यांच्यात भांडण झाले यानंतर सचिनने तिला बेदम मारहाण केली असा दावा करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सीमा हैदरच्या चेहऱ्यावर मारहाणीनंतरच्या जखमेच्या खुणा दिसत आहेत. व्हिडीओमध्ये सीमा त्या जखमेच्या खुणा दाखवताना दिसत आहे, ज्यामध्ये सीमाचा डोळा एखाद्याने जोरात बुक्की मारावी, त्याप्रमाणे सुजून काळानिळा झाला आहे, याशिवाय तिच्या ओठांच्या आत जखम झालीय. तिचा चेहरा अगदी रडवेलेला दिसतोय. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मात्र, तिच्याबरोबर अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी सीमा हैदर यांच्याशी चर्चा केली असता सीमा हैदरचा व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले. सीमा हैदरने सांगितले की, मला कोणीही मारहाण केली नाही.

सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनीही हा व्हिडीओ बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करुन हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. सीमाशी याचा काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर व्हायरल झाला आहे. हा पूर्णपणे चुकीचा व्हिडिओ आहे. सीमा हैदरचे वकील एपी सिंह म्हणतात, सीमाचा सोशल मीडिया आणि यूट्यूब चॅनलवर व्हायरल झालेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे आणि ही बातमी दिशाभूल करणारी आहे.

तसेच वकील एपी सिंह पुढे म्हणाले की, सीमा आणि सचिनमध्ये भांडण झालेले नाही. त्यांच्यात खूप प्रेम असून भांडणाची शक्यता नाही. या व्हिडिओंच्या माध्यमातून सचिन आणि सीमा हैदर यांच्यातील नात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.