Mumbai Local Fights: मुंबई लोकलमधील भांडणं हा काही नवा मुद्दा नाही पण काही वेळा भांडणात प्रवासी आपल्या मर्यादा अक्षरशः विसरून जातात. अशाच बेभान प्रवाशांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज चर्चेत असतात. व्हायरल होण्याची कितीही भीती असली तरी या विचित्र भांडणांवर आळा बसलेला नाही. एरवी महिलांच्या डब्यातील भांडण, पुरुषांच्या जनरल डब्यातील भांडण आपणही पाहिले असेल पण आता नव्याने व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये लेडीज विरुद्ध पुरुषांचा डब्बा अशी जुंपली पाहायला मिळत आहे. यात एका पुरुष प्रवाशाने तर मागचा पुढचा विचार न करता भांडणाच्या नादात महिलांसमोरच शर्ट काढून विचित्र हातवारे केले आहेत. हा नेमका प्रकार काय, पाहूया…
मुंबई लोकलमधील लेडीज कोचच्या बाजूला फर्स्ट क्लासचा पुरुषांचा डब्बा असतो. हा डब्बा मुळात लेडीज कोचमध्येच विभागणी करून बनवण्यात आल्याने मध्ये केवळ विभाजक रॉड्स असतात. अशाच डब्यातील भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. यात फर्स्ट क्लासमधील दोन पुरुष प्रवासी भांडत असताना बाजूच्या लेडीज डब्यातील काही महिलांना शिवीगाळ करतात आणि त्यावरून वाद चिघळतो. या भांडणात एक प्रवासी तर चक्क शर्ट काढून समोरच्याला मारहाण करू लागतो. महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने त्याही उलट शिव्या देऊ लागतात. काही वेळाने भांडणांतील दुसरा प्रवासी शर्ट काढलेल्या प्रवाशाचा गळा धरून त्याला धमकावू लागतो.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट करत उपहासाने हेच का मुंबईकरांचं स्पिरिट अशी टीका केली आहे. तर काहींनी पॉपकॉर्न असते तर हा व्हिडिओ पाहण्याची मज्जाच आली असती अशाही काही कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ नेमका कोणत्या ट्रेनमधील आहे हे काही समजू शकलेले नाही.