भारताच्या यशस्वी सर्जिकल स्टाईक नंतर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने वाराणसीच्या गल्लोगल्ली मोदींना शुभेच्छा देणारे पोस्टर लावले आहे. या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाच्या रुपात दाखवले आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना रावणाच्या रुपात दाखवले आहे. लाल फेटा घातलेले मोदी हे दहा तोंडं असलेल्या नवाज शरीफांवर धनुष्य रोखून धरत असल्याचे या फोटोमध्ये दाखवले आहे.
उरी हल्लाचा बदला घेत भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये शिरून सर्जिकल स्टाईक्स करत पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले. त्यांनतर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून भारतीय लष्करांचे आणि मोदींचे कौतुक होत आहे. त्यामुळे वाराणसी येथल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी गल्लोगल्ली मोदींचे कौतुक करणारे पोस्टर लावले आहे. या पोस्टरमध्ये नरेंद्र मोदी, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दाखवले आहे. यात मोदी हे श्रीरामाच्या रुपात दाखवले आहेत तर शरीफ हे रावण रुपात. या पोस्टरवर पाकिस्तानरुपी रावणाचा अंत करण्यासाठी आणखी एका सर्जिकल ऑपरेशनची गरज असल्याचे म्हटले आहे.
तर दुसरीकडे या पोस्टरच्या माध्यमातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल हा रावणाचा मुलगा असून ते पाकिस्तानचे समर्थक असल्याचे यात सांगितले आहे.