Drunk Girls Fight Viral Video: मध्यरात्रीचे शहर… रस्त्यांवर शांतता पसरलेली… पण अचानक जालना रोडवर सुरू झाला प्रचंड गोंधळ. लोक धावत बाहेर पडले आणि जे दृश्य डोळ्यांसमोर आलं, ते पाहून सगळ्यांचेच श्वास रोखले गेले. दोन तरुणी दारूच्या नशेत भररस्त्यात राडा घालत होत्या. शिवीगाळ, तोडफोड आणि थेट एकमेकींवर तुटून पडणं… एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर जवळच्या हॉटेलच्या काचाही त्यांनी फोडल्या. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही तासांतच सोशल मीडियावर झपाट्याने पसरू लागला. पोलिसांना शेवटी घटनास्थळी धाव घ्यावी लागली आणि त्यावेळी तरुणींच्या नशेचा ताप आणखीनच वाढला होता.
छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर शुक्रवारी मध्यरात्री असा एक प्रकार घडला की, पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. दारूच्या नशेत झिंगलेल्या दोन तरुणींनी भररस्त्यात असा राडा घातला की, रस्त्यावरून जाणाऱ्यांना पायउतार व्हावं लागलं. या तरुणींनी केवळ एकमेकींना मारहाण केली नाही, तर जवळच असलेल्या हॉटेलचीही तोडफोड केली. त्यांनी एवढ्यावरच न थांबता, पोलिसांसोबतही धक्काबुक्की आणि हुज्जत घालण्याचा प्रकार घडला. हा थरारक व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणींची नावं आरती प्रकाश कांबळे (३०, उस्मानपुरा पीर बाजार) आणि प्रतीक्षा बाळासाहेब भादवे (२५, उस्मानपुरा पीर बाजार) अशी आहेत. रात्री साधारण १२ वाजण्याच्या सुमारास दोघी जालना रोडवरील मोंढा नाका येथे आल्या. दारूच्या नशेत चूर झालेल्या दोन्ही तरुणींनी सुरुवातीला एकमेकींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या डॉमिनोज पिझ्झाच्या दुकानाजवळ गोंधळ घालत काचांची तोडफोड केली. पाहता पाहता हा गोंधळ मुख्य रस्त्यावर पोहोचला.
रस्त्याच्या मध्यभागी उभ्या राहून दोघींनी एकमेकींवर थपडांचा पाऊस पाडला. केस ओढणे, शिवीगाळ, ढकलाढकली अशा प्रकारांनी जवळपास तासभर राडा सुरू होता. या दृश्यामुळे पाहणाऱ्यांची एकच गर्दी झाली. काहींनी पोलिसांना माहिती दिली; तर काहींनी मोबाईलमध्ये हा प्रकार शूट करून, तो सोशल मीडियावर टाकला.
दरम्यान, पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेमुळे बिथरलेल्या त्या तरुणींनी पोलिसांशीही वाद घालायला सुरुवात केली. एवढंच नाही, तर त्यांना ताब्यात घेतले जात असताना त्यांनी पोलिसांसोबतही हुज्जत घालत, त्यांना धक्काबुक्की केली. अखेरीस समजूत घालत पोलिसांनी दोन्ही तरुणींना घाटी रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी दाखल केलं.
या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार घोडके पुढील तपास करीत आहेत.
भररस्त्यातील हा गोंधळ, तोडफोड व हाणामारीचा थरारक VIDEO सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, पाहणारे अक्षरशः थरारून जात आहेत. शहरात या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.