D-Mart Thief Caught CCTV: डीमार्टला सर्वसामान्यांकडून दररोजच्या गरजेचं सामान घेण्यासाठी प्राधान्य दिले जाते. आता याच डीमार्टमध्ये एक तरुण किराणा खरेदीसाठी शिरतो. पण, काही क्षणांतच त्याच्या हालचाली सीसीटीव्हीत कैद होतात. कारण- तो चक्क ‘अंडरवेअर’मध्ये काहीतरी लपवत होता. काय होतं त्या वस्तूमध्ये? किती तरी वेळा दुकानात येऊन तो हेच करत होता… आणि अखेर त्याचा पितळ उघडं पडलं. त्यानं ना सोनं चोरलं, ना पैसे… फक्त एक छोटीशी पुडी. पण, ती लपवण्यासाठी वापरली अशी जागा, जिथं कोणाचं लक्ष जाणारही नाही. पण, सीसीटीव्हीनं त्याचं हे संपूर्ण चोर्यकर्म उघडकीस आणलं आणि जी वस्तू त्याला इतकी महागात पडली, ती ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
हैदराबादच्या सनतनगरमधील डी-मार्टमध्ये नुकतीच अशी एक घटना घडली आहे, जी ऐकून आणि पाहून सगळेच थक्क झाले आहेत. किरकोळ वाटणाऱ्या वेलचीच्या पुडीसारख्या वस्तूची चोरी कुणी करेल, यावर विश्वास बसणार नाही. पण, त्याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे त्याची चोरीची पद्धत. या चोरानं चक्क वेलचीच्या पुड्या अंडरवेअरमध्ये लपवून पळवण्याचा प्रयत्न केला. एवढं काय आहे या वेलचीमध्ये, जो तरुण त्यासाठी इतका वेडा झाला की, तो त्या चक्क अंडरवेअरमध्ये लपवून घेऊ लागला. पण, लिफ्टमधल्या कॅमेऱ्यानं सगळं पाहिलं… आणि मग काय सगळाच मसाला बाहेर आला.
दैनंदिन खरेदीसाठी एक तरुण डी-मार्टमध्ये आला. त्यानं बास्केट घेतलं आणि त्यात त्यानं रोजच्या गरजेच्या काही वस्तू घेतल्या, त्यात वेलचीही होती. त्यानंतर तो लिफ्टनं वरच्या मजल्यावर गेला. लिफ्टमध्ये एकटाच असल्याचा गैरफायदा घेत, त्यानं बास्केटमधून वेलचीच्या पुड्या काढल्या आणि त्या अंडरवेअरमध्ये लपवून ठेवल्या. पण त्याला हे लक्षात आलं नाही की, लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि त्याची संपूर्ण हातचलाखी कैद होत होती. स्टोअर मॅनेजमेंटला वेलचीच्या पुड्या स्टॉकमध्ये कमी आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि चोरीचं पितळ उघडं पडलं.
पण खरी कमाल तेव्हा घडली, जेव्हा तोच तरुण काही तासांनंतर पुन्हा दुकानात आला. यावेळी त्यानं पुन्हा वेलचीच्या पुड्या घेतल्या आणि शौचालयात जाऊन त्याच पद्धतीनं पुड्या लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टाफ आता सजग होता. तरुण बाहेर पडताच त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं.
सुपरमार्केटमधील सुरक्षा व्यवस्था का महत्त्वाची?
या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे की, सुरक्षा कॅमेरे, सीसीटीव्ही आणि कर्मचाऱ्यांची सजगता ही चोरट्यांपासून संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे. लहानशी वाटणारी चोरीदेखील कायदेशीर गुंतागुंत आणि सामाजिक अपमान यांचं कारण ठरू शकते. चोरी कितीही लहान असली तरी त्याचे परिणाम मोठे असू शकतात याचा विचार या चोरीच्या निमित्तानं पुढे आलाय.
ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. एका किरकोळ वस्तूसाठी केलेली ही ‘सर्जनशील’ चोरी सोशल मीडियावरही चर्चेत आहे.