Thar Accident CCTV Video: तो एक शांत दुपारचा क्षण होता… सगळं नेहमीसारखं चाललं होतं, पण काही सेकंदांत सारा परिसर थरारून गेला. एक वृद्ध व्यक्ती स्कुटीवरून जात होती आणि अचानक त्यांच्या आयुष्यात विजेसारखा हादरा बसला. थारसारखी महागडी आणि ताकदवान गाडी त्यांना जोरात धडकली… पण थरकाप उडवणारा क्षण तेव्हा आला, जेव्हा तीच गाडी पुन्हा रिव्हर्स घेऊन त्यांच्यावर चढवली गेली. हा अपघात होता की नियोजनबद्ध हत्या? सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा भयावह क्षण बघून अंगावर शहारे येतील…
थरकाप उडवणारा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक थार SUV वाहनचालक आधी स्कुटीवर जात असलेल्या वृद्धाला जबर टक्कर देतो आणि त्यानंतर काय घडतं हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. कारण इतक्यावरच तो थांबत नाही, तर तो थारचालक गाडी रिव्हर्स घेतो आणि थेट त्या वृद्धावर पुन्हा चढवतो. ही घटना २७ जुलै रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास गांधीनगर ते ग्रीन बेल्ट पार्क रस्त्यावर घडली आहे.
थारच्या चाकांखाली वृद्धाचा जीव!
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की, वृद्ध व्यक्ती स्कुटीवरून जात असताना थारने त्यांना जोरात उडवलं. इतक्यावरच न थांबता, थारचालकाने गाडी रिव्हर्स घेत त्याच वृद्धाला परतून जोरदार धडक दिली. नंतर तो गाडीतून उतरतो, जखमी वृद्धाला शिवीगाळ करतो आणि पुन्हा गाडीत बसून घटनास्थळावरून पळून जातो. हे सगळं इतक्या थंडपणे केलं जातं की त्यामागची माणुसकी कुठेच दिसत नाही.
घटनेनंतर काय घडलं?
जखमी वृद्धाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. पीडिताच्या कुटुंबीयांनी थेट आरोप केला आहे की, हा कुठलाही अपघात नसून, ठार मारण्याचा प्रयत्न आहे. आरोपीचं नाव मनन आनंद असून, तो घटनेनंतर फरार आहे.
हत्येचा गुन्हा दाखल!
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम २८१ (लापरवाहीने वाहन चालवणे), कलम १०९ (हत्या करण्याचा प्रयत्न) आणि १२५अ (एखाद्याच्या जीविताला धोका निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. पोलिसांचा दावा आहे की, आरोपी लवकरच अटकेत असेल आणि आम्ही पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.