Shocking video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. ‘माय असे उन्हातील सावली, माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल, यावीत आता दु:खे खुशाल’ अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. नेहमी आपल्या मुलांच्या पाठीशी असलेली आई वेळ आली, तर सैतानालाही धूळ चाखवू शकते. याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडीओतून दिसून येत आहे. एका महिलेने आपल्या मुलाला कुत्र्यांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी त्या मातेनं स्वत:चा जीव धोक्यात घातला. या आईनं आपल्या बाळाला कसं वाचवलं ते तुम्हीच पाहा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साधारण दुपारची वेळ आहे आणि यावेळी एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन एका गल्लीतून जाताना दिसत आहे. त्या गल्लीत त्या दोघांशिवाय कुणीही दिसत नाहीये. याचाच गैरफायदा घेऊन काही कुत्रे त्या बाळावर हल्ला करण्याच्या मिषानं पुढे येतात. कुत्र्यांना पाहून ही महिला घाबरते आणि तिच्या बाळाला उचलून घेते. यावेळी आणखी ४, ५ कुत्रे तिथे येतात आणि त्या महिलेवर हल्ला करतात. परिस्थिती पाहून महिला तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते. मात्र, कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये ती खाली कोसळते. एवढं होऊनही तिनं बाळाला घट्ट पकडून ठेवल्याचं दिसत आहे. त्यानंतर कुत्रे तिच्यावर हल्ला करतात; मात्र तरीही ती बाळाचं संरक्षण करताना दिसत आहे. यावेळी महिलेनं सुटकेसाठी मदतीसाठी दिलेल्या आर्त हाका ऐकून आजूबाजूचे लोक तिच्या मदतीला धावून येतात आणि त्या निरापराध बालकांच्या शिकारीसाठी सोकावलेल्या भटक्या कुत्र्यांना हाकलवून लावतात.

ही घटना जीवावर बेतणारी घटना ठरली असती; पण आईनं दाखविलेल्या धाडसामुळेच तिचा लेक वाचला. आई आपल्या मुलांवर नि:स्वार्थी प्रेमाचा वर्षाव करते. अडीअडचणीत सापडलेल्या मुलाला जीवाची पर्वा न करता, संकटातून सहीसलामत बाहेर काढते हे सर्वश्रुत आहेच. दरम्यान, समोर आलेल्या या घटनेनंही पुन्हा एकदा हे सिद्ध केलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गाळा भाड्यानं देण्यासाठी दुकानाबाहेर लावली जाहिरात; वाचून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत या महिलेचं कौतुक करीत आहेत. एकानं म्हटलंय की, आई ही आईच असते. दुसऱ्या एकानं कमेंट केलीय की, आईसारखा योद्धा संपूर्ण जगात नाही. शेवटी आणखी एकानं कमेंट केलीय की, शेवटी विषय काळजाचा होता.