Shocking Video: आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते.
आपल्या लेकराला कुठे खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होतो. अशा वेळेस जर आपल्याच डोळ्यासमोर लेकराचं काय बरं वाईट झालं तर काय होईल… सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक लहान बाळ बसमधून थेट रस्त्यावरच पडलं.
व्हायरल व्हिडीओ (Kid Accident Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही घटना तमिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील श्रीविल्लिपुथूरजवळ घडली. शुक्रवारी सकाळी एका चालत्या बसमधून एका वर्षांची मुलगी खाली पडली. ही मुलगी आईच्या हातात होती, पण मेनाक्शीपूरम जंक्शनजवळ चालकाने अचानक ब्रेक मारल्याने ती पुढच्या दरवाजातून घसरून खाली पडली.
FPJच्या वृत्तानुसार त्या बाळाचे काका मधनकुमार मुथुरामलिंगपूरमचे रहिवासी आहेत. हे सर्वजण खासगी बसने प्रवास करत होते. ते बसच्या पुढच्या दरवाज्याजवळ बसले होते. सकाळी सुमारे ८:३० वाजता, बस मीनाक्षीपूरम सिग्नलजवळ पोहोचली, तेव्हा चालकाने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे धक्का बसला आणि बाळ आईच्या हातातून घसरून दरवाजातून रस्त्यावर पडले.
बाळ खाली पडतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे, ज्यामुळे अनेक लोक काळजीत आहेत. सुदैवाने बाळाला फक्त किरकोळ दुखापत झाली असून तिला लगेच जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तिच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे.
इंडियन एक्सप्रेस तमिळच्या अहवालानुसार, त्याच बसमध्ये मधनकुमार आपल्या बहिणीच्या दोन वर्षांच्या मुलाला पकडून होते. अचानक ब्रेक लागल्याने त्यांचाही तोल गेला. बाळ बसमध्येच खाली पडले आणि त्याला खरचटले. मधनकुमारलाही त्या बाळाला वाचवताना दुखापत झाली. सध्या दोघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत.
या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, पण बसमध्ये उघड्या किंवा सुरक्षित नसलेल्या जागेजवळ बसल्यास किती धोका असतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सध्या बसचालकावर कोणतीही कारवाई झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी अजून तपास किंवा चौकशी होणार की नाही, हे सांगितलेले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @PttvNewsX या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.