Waterfall Accident Haridwar: सोशल मीडियावर रील्स बनवण्याचा नाद तरुणाईच्या डोक्यावर चढून बसला आहे. कुणी बाईकवर स्टंट करताना, तर कुणी डोंगरदऱ्यांमध्ये धोकादायक पोज देताना दिसतो. या ट्रेंडची भुरळ इतकी वाढली आहे की, आता हा छंद जीवघेणा ठरू लागला आहे. काही सेकंदांचा व्हिडीओ आणि काहीशे लाइक्स यांसाठी तरुण मंडळी स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि कधी कधी ही मजा मृत्यूची घंटा ठरते.

लाइक्स आणि फॉलोअर्सच्या नादात किती ‘वाहवत’ जाऊ शकतो माणूस? सोशल मीडियावर रील बनवताना एका क्षणाचा थरारक व्हिडीओ आयुष्यभरासाठी अंधार घेऊन आला. हरिद्वारच्या रवासन नदीतील धक्कादायक अपघातानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही सेकंदांच्या रीलसाठी एकावर जीव गमावण्याची वेळ आली तेव्हा आजूबाजूचे लोकही थिजून गेले…

हरिद्वारचा थरकाप उडवणारा अपघात

उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यात रवासन नदीवर असा एक हृदयद्रावक प्रसंग घडला. कांगडी भागात राहणारा एक तरुण रवासन नदीच्या धबधब्याजवळ इन्स्टाग्रामसाठी रील शूट करीत होता. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, तो धबधब्याखाली उभा राहून पोज देतो आहे. पण, काही क्षणांतच पाण्याच्या प्रचंड प्रवाहानं त्याला गाठलं आणि क्षणार्धात तो वाहून गेला. डोळ्यांसमोर घडलेला हा प्रसंग पाहून उपस्थितांचीही धडधड वाढली.

प्रशासन आणि बचाव पथकाची धडपड

घटनास्थळी तत्काळ प्रशासन व पाणबुड्यांचे पथक दाखल झाले. त्या युवकाचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, बातमी लिहेपर्यंत त्याचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. हा व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर)वर @askbhupi या हँडलवरून शेअर करण्यात आला असून, काही तासांतच तो तुफान व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया : “लाइक्ससाठी जीव धोक्यात?”

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकरी हादरले असून, संतापले आहेत. काहींनी म्हटलं, “हेच त्या धोकादायक ट्रेंडचं भयावह रूप आहे.” तर काहींनी हळहळ व्यक्त करीत सांगितलं, “केवळ एका रीलसाठी स्वतःच्या जीवाशी खेळणं म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे.”

येथे पाहा व्हिडीओ

धडा काय घ्याल?

ही घटना समाजासाठी एक मोठा धडा आहे. रील्स आणि फॉलोअर्सच्या नादात आयुष्य धोक्यात घालणं हे कधीही शहाणपणाचं नाही. प्रशासन व तज्ज्ञ वारंवार आवाहन करीत आहेत. “प्रथम तुमची सुरक्षा, मग सोशल मीडिया.”

थोडक्यात, काही सेकंदांच्या रीलसाठी जीवनाचा शेवट करणं टाळा. कारण- जीवन एकदाच मिळतं. रील्स पुन्हा बनवता येतील; पण हरवलेला जीव परत मिळणार नाही.