King Cobra Rescue Shocking Video : साप, अजगर पाहताच भल्याभल्यांना घाम फुटतो. यात जगभरात विषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. यातील एक विषारी प्रजाती म्हणजे किंग कोब्रा. या सापाच्या एका दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो, म्हणून अनेक भलेभले प्राणीदेखील त्याच्यापासून अंतर ठेवून राहतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका भल्या मोठ्या किंग कोब्राचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यातील किंग कोब्राचा आकार पाहूनच तुमचा थरकाप उडेल. पण, एका महिला वनअधिकारीने मोठ्या हिमतीने ओढ्यातून सरपटणाऱ्या किंग कोब्राचे रेस्क्यू केलं. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
किंग कोब्राचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन
केरळमधील हा व्हिडीओ आहे, ज्यात वन विभागाच्या अधिकारी जीएस रोशनी यांनी मोठ्या हिमतीने एका महाकाय किंग कोब्रा सापाला रेस्क्यू केलं. निवृत्त भारतीय वन सेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी एक्सवर किंग कोब्राच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पारुथीपल्ली रेंजच्या बीट फॉरेस्ट ऑफिसर जीएस रोशनी अवघ्या काही मिनिटांत एका नदीत सरपटणाऱ्या महाकाय किंग कोब्राचं रेस्क्यू करताना दिसतायत.
तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पेप्पारा जवळील जंगलातील एका ओढ्यातून या किंग कोब्राची सुटका करण्यात आली. या ओढ्यात पावसात खूप पाणी असतं, त्यामुळे अनेक स्थानिक लोक अंघोळ करण्यासाठी येतात. त्यामुळे या किंग कोब्रामुळे कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अधिकारी रोशनी यांनी ताबडतोब कारवाई करत सापाला रेस्क्यू केलं.
व्हिडीओत पाहू शकता की, ओढ्यातून एक महाकाय किंग कोब्रा सरपटत झुडपात लपण्याचा प्रयत्न करतोय. पण, वनअधिकारी एका पिशवीत त्याला पकडण्याचा प्रयत्न करतायत. पण, तो साप मात्र त्या पिशवीत काही शिरत नाही; अखेर त्या सापाची शेपटी पकडतात आणि त्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करू लागतात. पण, तो साप फणा वर करून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करतो. अखेर कसंबसं त्याला काठावर घेऊन येतात आणि खूप प्रयत्नांनंतर सापाला पिशवीत भरून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडतात.
हा व्हिडीओ शेअर करत निवृत्त आयएफएस सुशांत नंदा यांनी लिहिले की, ‘ग्रीन क्वीन्स’ आणि त्यांनी जंगलात दाखवलेल्या शौर्याला माझा सलाम. त्यांनी सांगितले की, जीएस रोशनी ही केरळ वन विभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमचा भाग आहे, ज्यांनी १६ फूट लांबीच्या किंग कोब्राला वाचवले.
किंग कोब्राच्या बचावाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स महिला अधिकाऱ्याच्या शौर्याचे आणि संयमाचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, खूप धाडसी महिला. दुसऱ्याने म्हटले की, वन अधिकारी, ग्राउंड स्टाफ आणि सुरक्षा कर्मचारी हेच खरे लोक आहेत, जे त्यांचे काम करतात. तिसऱ्याने लिहिले की, कोब्राचा आकार पाहून मला धक्का बसला.