सोशल नेटवर्किंगवर काय कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या दिवंगत अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यासंदर्भातील असाच एक किस्सा सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. लागूंबरोबर घडलेल्या या प्रकरणाचा संबंध सध्याच्या डॉक्टरांशी जोडला जात आहे. पूर्वीच्या काळी नियम कसे होते आणि आता नियम कसे आहेत यासंदर्भातील भाष्य या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलं आहे. या पोस्टमध्ये लागू यांनी केलेल्या एका जाहिरातीचाही फोटो व्हायरल होत आहे. जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण….

८० च्या दशकात डॉ. श्रीराम लागू यांनी चवनप्राशच्या काही जाहिराती केल्या होत्या. डाबर चवनप्राशची फोटोमधील जाहिरातही त्यांनी केली होती. श्रीराम लागूंनी स्वतः वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं. ते स्वत: डॉक्टर होते व नंतर ते अभिनयाच्या क्षेत्रात आले होते. एका डॉक्टरने जाहिरात करणे हा तेव्हा वादाचा मुद्दा ठरला होता. हे प्रकरण एवढं तापलं की महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमसीआयकडे) गेलं होतं. ‘नैतिकतेच्या’ मुद्यावर डॉ. श्रीराम लागू यांची डॉक्टरकी करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते. डॉक्टर म्हणून करण्यात आलेली त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली होती, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

डॉक्टर लागूंवर झालेल्या याच कारवाईचा संदर्भ देत आज अनेक डॉक्टर कोरोनील औषधाच्या जाहिराती करत आहेत. मात्र त्यांच्यावर काहीच कठोर कारवाई केली जात नाही, असं व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे. यंत्रणा, व्यवस्था ताब्यात घेतल्या की अनैतिक, बेकायदेशीर, घटनाबाह्य काहीही करण्याची हिंमत वाढलेली असते, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

जेष्ठ पत्रकार अंकुर भारद्वाज यांनीही यासंदर्भातील ट्विट इंग्रजीमध्ये केलं असून ते दोन हजारहून अधिक जणांनी शेअर केलं आहे.

खरंच असं घडलं होतं का?

‘लोकसत्ता डॉटकॉम’ने यासंदर्भात ज्येष्ठ सिनेसमीक्षक आणि जाणकार दिलीप ठाकूर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी खरोखरच असं घडल्याची माहिती दिली. “डॉ. लागूंची डॉक्टरी काढून घेतल्याचं प्रकरण खरं आहे. पण नंतर या प्रकरणाचं काय झालं ठाऊक नाही. यासंदर्भातील कोणतीही माहिती पुढे आली नाही. कला क्षेत्रात चमकल्यानंतर लागू मात्र पुन्हा डॉक्टर या नावाने ओळखले जाऊ लागले,” असं ठाकूर यांनी सांगितलं आहे.

सोशल नेटवर्किंगवर इतरही काही अकाउंटवरुनही ही जाहिरात शेअर करण्यात आलीय.

१)

२)

या पोस्टच्या माध्यमातून श्रीराम लागूंवर ज्याप्रमाणे जाहिरात करण्यासाठी कारवाई करण्यात आली तशीच कारवाई आता कोरोनीलची जाहिरात करणाऱ्या डॉक्टरांवर तसेच तसेच कोरोना काळात रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍यांवर का करण्यात येत नाही असा प्रश्न विचारला जात आहे.