एक दिवसापूर्वीच आपण पाकिस्तानी एअरलाईन्सच्या बेजबाबदार वैमानिकाबद्दल वाचलं होतं, प्रवाशांचे जीव धोक्यात घालून प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा अंगावर सारी जबाबदारी टाकून तो झोपा काढत होता. पण जॉन चार्ल्स रिची हे या वैमानिकासारखे नाहीत, किंबहुना त्यांच्यासारखा वैमानिक क्वचितच कुठे सापडेल. साऊथवेस्ट एअरलाइन्समध्ये ते २२ वर्षांपासून वैमानिक आहेत. गेल्या २२ वर्षांमध्ये लाखो प्रवाशांना त्यांनी सुखरूप इच्छित स्थळी पोहोचवले. पण आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप खास होता. त्यांची २२ वर्षांची सेवापूर्ती आणि आजवर १० लाख प्रवाशांना इच्छित स्थळी वाहून नेण्याचा टप्पा या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी पूर्ण होत होत्या. तेव्हा हा क्षण अधिक खास बनवण्यासाठी जॉनने हटके काहीतरी करण्याचे ठरवले.

सारे प्रवासी विमानात चढल्यानंतर जॉन स्वत: त्यांना भेटण्यासाठी बाहेर आले. इंटरकॉमवरून त्यांनी विमानात एक घोषणा केली. आपल्या कारकिर्दीला आज २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि सध्या विमानात उपस्थित असलेले प्रवाशी धरून आतापर्यंत त्यांनी एकूण १० लाख प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवले आहे. हे ऐकून विमानातल्या साऱ्या उपस्थित प्रवाशांनी जॉन यांना टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या. पण पुढे त्यांनी जे काही केले ते पाहून अनेकांची मनं जॉनने जिंकली. त्यांनी प्रवाशांची यादी मागवली होती. या यादीत त्यांच्या १० लाखाव्या प्रवाशांचे नाव होते. जॉन थेट त्या प्रवाशाकडे गेले आणि त्यांनी या प्रवाशासाठी आणलेल्या वेगवेगळ्या भेटवस्तू देऊ केल्या. एवढेच नाही तर शॅम्पेनची बाटली उघडून त्यांनी साऱ्या प्रवाशांसोबत हा आनंद साजरा केला.

पण त्यांचा आनंदोत्सव इथेच संपला नाही त्यांची १० लाखावी प्रवासी ही महिला होती. तिने या प्रवासासाठी किती रुपये मोजले याची माहिती जॉनने मिळवली आणि तिच्या तिकिटीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात तिला भेट दिली. जॉन यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.