ST Bus Started Leaking In Beed Viral Viral : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्यासह प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसची दुरवस्था वारंवार समोर येत आहे. मंडळाकडून अनेकदा रस्त्यात मधेच बंद पडणाऱ्या बसेस देऊन प्रवाशांचा छळ सुरू असतोच. त्यात आता ऐन पावसाळ्यात गळक्या बसेस देऊन प्रवाशांना नाहक त्रास दिला जात आहे. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून एसटी महामंडळाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवस-रात्र धो-धो पाऊस पडतोय. अशात एसटी बसेसची दुर्दशा झाली आहे. पावसाळ्यात अनेक जुन्या बसेस आतून सर्रास गळतायत. छतावरून धो-धो पाणी गळतेय. त्यामुळे अनेक प्रवाशांना चक्क एसटीच्या सीट्सवर छत्री घेऊन बसण्याची वेळ आली आहे. गळक्या छतांमुळे सीट्सवर ओल्या होत असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागा नाहीत. त्यामुळे प्रवासी चक्क एसटी बसमध्ये छत्री घेत उभे राहून प्रवास करतायत. गळणाऱ्या घाणेरड्या पाण्याने कित्येकांचे कपडे घाण होतायत. पाटोदा-बीड-परभणी बसमधील असाच एक विदारक व्हिडीओ व्हायरल होतोय.
व्हिडीओत पाहू शकता की, धावत्या एसटी बसचे छत गळत असल्याने अनेक प्रवासी चक्क छत्री घेऊन बसलेत. छतावरून गळणारे पावसाचे धो – धो पाणी थेट सीट्सवर पडतेय. अशाने सीट्स असूनही अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतोय. पण, हे प्रवासीदेखील हातात छत्री घेत उभे राहून प्रवास करतायत. एकीकडे पावसामुळे गळणारे एसटीचे छत आणि दुसरीकडे बसण्यास सीट्स नसल्याने प्रवाशांना दुहेरी अडचणींचा सामना करावा लागतोय. ही अवस्था पाहून आता रोज एसटीने प्रवास करणारे लोक तीव्र संताप व्यक्त करतायत.
एसटी बसेसच्या अशा अवस्थेकडे राज्याचे परिवहन मंत्री लक्ष देणार की नाही, असा प्रश्न आता प्रवासी विचारतायत. कारण- ही यंदाची नाही, तर दरवर्षीची परिस्थिती आहे. त्यामुळे तिकिटासाठी पैसे मोजूनही जर अशा वाईट सुविधा मिळणार असतील, तर जाब विचारायचा तरी कोणाला, असा प्रश्नही प्रवाशांना पडलायत. त्यात गणेशोत्सवानिमित्त अनेक प्रवासी गावी जाण्यासाठी एसटी बसेसची बुकिंग करतायत; पण एसटी बसेसची अशी अवस्था पाहून प्रवासीदेखील चिंतेत आहेत.