पक्षांचा किलबिलाट नेहमी आपल्या कानांना सुखावणारा असतो. यात भल्या पहाटे पक्षांचा मधुर आवाज कानावर पडला की दिवसाची सुरुवातही आनंदी वाटू लागते. पण, पक्ष्यांच्या याच आवाजाने वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ आणल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हे पक्षी झाडांवर बसून पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा इतका हुबेहूब आवाज काढू लागले की, जे ऐकून पोलिसही गोंधळात पडले. पोलिस अधिकाऱ्यांना आपल्या वाहनाच्या सायरनमध्येच काही तरी बिघाड झालाय की काय असे वाटू लागले. सध्या सोशल मीडियावर पोलिसांच्या सायरनचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या पक्ष्यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

ब्रिटनमधील बिसेस्टर शहरात ही घटना घडली आहे. इथे तारेवर बसलेले पक्षी पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा हुबेहूब आवाज काढू लागले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत पोलिस टीमच्या प्रवक्त्याने सांगितले की हा विनोद नाही, परंतु काही पक्षी बिसेस्टर शहरातील वाहतूक पोलिसांना मूर्ख बनवण्यात यशस्वी झाले आहेत.

सायरनचा आवाज ऐकून पोलिस अधिकारी चक्रावले

मीडिया रिपोर्ट्समध्ये पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितले की, पक्षी जे आवाज काढत होते ते पोलिसांच्या वाहनांमध्ये बसवलेल्या सायरनच्या आवाजाशी इतके मिळते जुळते होते की, जे ऐकून पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या गाड्यांमध्ये अचानक काही बिघाड झाला की काय, असा प्रश्न पडला. कारण अचानक झाडांवर बसलेले पक्षी किलबिलाट करत असताना सायरनचा आवाज काढू लागले.

थेम्स व्हॅली पोलिसांनी त्यांच्या ‘एक्स’वर या पक्ष्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये झाडांवर बसलेले पक्षी पोलिसांच्या सायरनसारखा हुबेहूब आवाज काढताना दिसत आहेत. यावर पोलिसांनी लिहिले की, “आमच्या वर्कशॉपमध्ये दोन टोन सायरन ट्यूनची चाचणी घेण्यापासून ते वाहनांवर गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत, हा छोटा पक्षी झाडावर बसून सर्व काही पाहत आहे, जेणेकरून तो ते ऐकून पुन्हा असे करू शकेल.

पक्ष्यांचा हा मजेशीर कृतीचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटिझन्स भरपूर कमेंट करत आहेत. एका युजरने पोलिसांना मजेशीर ढंगात विचारले की, ‘हे पक्षी त्यांच्या स्पेशल टीमचा किंवा फ्लाइंग स्क्वाडचा भाग आहेत का?’ दुसऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘इतक्या चांगल्या कामगिरीसाठी ते तुमच्या टीमचा भाग होऊ शकत नाही का?’ तिसऱ्याने लिहिले की, ‘पोलिसांचा गणवेश घालणे किंवा पोलिसाची तोतयागिरी करणे हे बेकायदा आहे हे आम्हाला माहीत आहे, पण कॉपी केल्याबद्दल या पक्ष्याला शिक्षा होऊ शकते का?’

रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…

१५ ते २० वेगवेगळे आवाज काढू शकतात हे पक्षी

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पक्ष्याचे नाव स्टारलिंग आहे, जो आकाराने खूपच लहान आहे आणि मोठ्या गटात राहतो. ते पक्षी सहसा खूप आवाज करतात आणि आवाजांचे अनुकरण करण्यात तज्ज्ञ असतात. ते फोन रिंगटोन, बाइक, अलार्म इत्यादींसह सुमारे १५ ते २० वेगवेगळे आवाज काढू शकतात. त्यांचा रंग चमकदार काळा असतो. त्यांची चोच ऋतूनुसार रंग बदलते, हिवाळ्यात काळी आणि उन्हाळ्यात पिवळी होते. हिवाळ्याच्या काळात हे पक्षी विशेषत: भारतातील मैदानी भागात दिसतात.