Biryani ATM : एटीएममुळे आपलं काम अगदी सोपं झालं आहे. यामुळे ना बँकेत जाण्याची गरज लागते, ना मोठ्या रांगेत उभं राहण्याची…फक्त एटीएममध्ये जा, कार्ड वापरा आणि हवी ती रक्कम अकाउंटमधून काढून घ्या. अवघ्या काही सेकंदात मशीनमधून रक्कम हातात येते. पण अलीकडेच तुम्ही एटीएममधून पैसे नाही तर इडली मिळत असल्याचा एक भन्नाट व्हिडीओ पाहायला असेल. बेंगळुरुमधील त्या इडली एटीएम मशीनमधून काही मिनिटांत इडली- चटणी पॅकेट हातात येते. अशात इडली एटीएमला टक्कर देणारा बिर्याणी एटीएम मशीनचा व्हिडीओ आता वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
चवीला कोणती बिर्याणी चांगली यावरून नेहमीच चर्चा रंगते. मात्र या अनोख्या एटीएममधून खवय्यांना आवडेल त्या बिर्याणीची चव चाखता येत आहे. या अनोख्या बिर्याणी एटीएमने नेटकऱ्यांना खुश केलं आहे. कारण भारतात बिर्याणी हा एक आवडीचा पदार्थ आहे.
food vettai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे बिर्याणी एटीएम The BVK Biryani आउटलेटमध्ये दिसतेय. यात एक व्यक्ती बिर्याणीसाठी एटीएम मशीनमध्ये जातो. काही ऑप्शन सिलेक्ट करतो, ठरावीक रक्कम भरतो आणि काही मिनिटे प्रतिक्षा करतो. यानंतर काही मिनिटांत बिर्याणीसोबत कांदा, आणि ग्रेव्ही असं सर्व वेगवेगळ्या डब्ब्यातून बाहेर येते. साधारपणे बँकेच्या एटीएम दिसायला तसेच आहे. फक्त त्याचा आकार एटीएमच्या तुलनेत आणखी मोठा आहे.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आउलेटचे ठिकाणही नमूद केले आहे. हे ठिकाणं कोलाधूर, चेन्नईतील आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ५८ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. काही युजर्स आता एटीएम मशीनमधून मिळणारी बिर्याणी खाण्यास उत्सुक आहेत. तर काही युजर्सनी बिर्याणीची किंमत खूपचं जास्त असल्याचे म्हटले आहे. तर इंटरनेटवरील काहींनी बिर्याणीच्या चवीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कारण बिर्याणी हा असा पदार्थ आहेत जो त्याच्या सर्वोत्तम चवीसाठी ओळखला जातो.
या मशीनमध्ये केवळ बिर्याणीच नाही तर इतर अनेक पदार्थांचे पर्याय दिसत आहेत. पण तुम्ही बिर्याणीचा पर्याय सिलेक्ट केल्यास स्क्रीनवर बिर्यानीचे अनेक पर्याय दाखवले जातात. यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेल्या बिर्याणीचे किती पॅकेट पाहिजे ते टाकावे लागते. यानंतर स्कॅनिंगचे ऑप्शन येते. स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ऑर्डर येण्यासाठी ४ मिनिटे वाट पाहावी लागते. यानंतर तुम्हाला ऑर्डर केलेली बिर्याणी त्या मशीनमधून बाहेर येते. आहे की नाही, रेडिमेंड बिर्याणी हातात आणून देणारं भन्नाट मशीन?