Fire Stunt Viral Video : लोक स्टंटबाजीच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घालायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. लाइक्स आणि व्ह्युजच्या नादात ते इतके वेडे होतात की, मरण पत्करायही तयार असतात. सध्या असाच एका स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती स्टंटच्या नादात असे काही करते की, त्याचा जीव जाता जाता वाचतो. अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्काच बसला आहे.
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे खतरनाक स्टंट करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण या लोकांनी समजले पाहिजे की, स्टंट हे काही मुलांचे खेळ नाहीत. त्यासाठी खूप सराव आवश्यक आहे; परंतु काहींना ते समजत नाही. आता समोर आलेल्या व्हिडीओतच पाहा ना, जिथे स्टंट करताना एका व्यक्ती अशी काही चूक करते की, ती स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देते.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डीजेच्या गाडीवर मुलांचा एक ग्रुप उभा आहे. दरम्यान, त्यांच्यातील शर्टाशिवाय उघडा असलेला एक जण बाटलीतून पेट्रोल तोंडात ओततो आणि आगीचे खेळ दाखविण्यास सुरुवात करतो. ते पाहून उर्वरित लोकही त्याला पाठिंबा देताना दिसत आहे; पण तोंडातील पेट्रोल हवेत ओकत आग लावताच ती आग त्याच्या चेहऱ्यावरही पसरते. त्यामुळे त्याचा चेहरा अचानक पेट घेतो. मग क्षणार्धात आग त्याच्या संपूर्ण शरीरावर पसरते. यावेळी उर्वरित लोक ती आग विझवण्याचा प्रयत्न करीत असतात; पण त्या आगीत त्यांच्या अंगावरील कपडेही पेट घेतात. त्यामुळे एकाच्या स्टंटबाजीच्या नादात इतर लोकही आगीत भाजले जातात. त्यामुळे डीजेच्या ट्रकवरून सगळे लगेच खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागतात.
हे भयानक दृश्य @PalsSkit नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे, ज्यावर हजारो लोक कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, हा सगळा लाईक्स आणि व्ह्यूजचा खेळ आहे. दुसऱ्याने लिहिले की, तो त्याच्या चुकीमुळे थोडक्यात बचावला. तिसऱ्याने लिहिले की, असे कोण करते.