Sunroof Accident Video Goes Viral: आजकाल सनरूफ असलेल्या गाड्यांची क्रेझ प्रचंड वाढली आहे. कुणीही नवी कार घ्यायला गेलं की, कुटुंबातील सदस्यांना सनरूफ असलेली गाडी घेण्याचं वेड लागतं. पण, या थ्रिलमध्ये लपलेला धोका किती भीषण असू शकतो हे अनेकांना माहीत नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने पालकांच्या काळजाचे ठोके चुकवले आहेत.
व्हायरल CCTV फुटेजमध्ये दिसतं की, एक कार रस्त्यावरून वेगानं जात असते. गाडीचं सनरूफ उघडं असतं आणि त्यातून एक छोटा मुलगा डोकं बाहेर काढून उभा असतो. सुरुवातीला हे एखाद्या खेळासारखं वाटतं; पण काही क्षणांतच दृश्य अंगावर काटा आणणारं ठरतं.
गाडी एखाद्या अंडरपास किंवा रेल्वे क्रॉसिंगजवळून पुढे सरकते आणि अचानक समोरून आलेल्या मोठ्या रेलिंगला मुलाचं डोकं जोरात आपटतं. या धक्क्यानं मुलाचं शरीर आतल्या बाजूला फेकलं जातं. हा अपघात किती भयानक होता हे CCTV मध्ये स्पष्ट दिसतं.
स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, या अपघातात मुलाला गंभीर जखमा झालेल्या नाहीत; पण हा प्रसंग प्रत्येक पालक आणि गाडीधारकासाठी सावधानतेचा इशारा देणारा आहे.
या व्हिडीओने सोशल मीडियावर लाखो लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी पालकांची जबाबदारी, रोड सेफ्टीचे महत्त्व व मुलांच्या सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांविरुद्ध टीका केली.
आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी हा प्रसंग पाहताच गाडी थांबवली आणि धाव घेऊन मुलाकडे लक्ष दिलं. ही घटना पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. हा अपघात शनिवारच्या दिवशी विद्यारण्यपूरा परिसरात घडला. व्हिडीओ X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला गेला असून, अनेक लोकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या.
एका युजरने लिहिलं, “हे अगदी तज्ज्ञांनी आधीच सांगितलेलं होतं. सनरूफमधून डोकं बाहेर काढणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे.” दुसरा म्हणाला, “सनरूफ हे भारतासाठी सर्वांत वाईट फीचर आहे. त्यावर बंदी घालायला हवी.” तर आणखी एकाने प्रतिक्रिया दिली, “पालक मुलांना मजा करायला देतात; पण हाच खेळ त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.”
धक्कादायक बाब म्हणजे भारतात अशा कृतीवर दंड ठोठावला जातो. तरीही लोकांची बेफिकिरी कमी होत नाही.
त्यामुळे हा व्हिडीओ प्रत्येक पालक आणि गाडीधारकासाठी एक मोठा इशारा आहे. थोड्या थ्रिलसाठी आपण आपला किंवा आपल्या लेकरांचा जीव धोक्यात घालतोय का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायलाच हवा.