शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालवणे म्हणजे एकप्रकारे आपला जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. तरीही अनेक चालक स्वत:सह प्रवाशांच्या जीवाचीही पर्वा न करता भरधाव वेगाने गाडी चालवताना दिसतात. अशाप्रकारे कोलकत्तामधील एका भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक खाजगी बसने रस्त्याच्या पलीकडून येणाऱ्या एसयूव्ही कारला जोरदार धडक दिली आहे, ज्यात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहे. स्थानिक आउटलेट्सनुसार, सॉल्ट लेक सेक्टर ५ मधील सर्वात व्यस्त केंद्रांपैकी एक असलेल्या कॉलेज जंक्शन येथे सोमवारी (२ ऑक्टोबर) हा अपघात झाला. यात लाल सिग्नल तोडून एक बस भरधाव वेगाने जात होती, यावेळी बसने पलीकडून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. ही घटना ट्रॅफिक जंक्शनवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या अपघातातून पलीकडील रस्त्यावर सिग्नल सुटण्याची वाट पाहणारे दोन बाइकस्वार थोडक्यात वाचवले आहे, सीसीटीव्हीमध्ये अपघातानंतर अनेक लोक प्रवाशांना वाचवण्यासाठी बस आणि एसयूव्हीकडे धावताना दिसत आहेत. अपघाताच्या वेळी बाइक स्वारांनी हेल्मेट परिधान केले होते ज्यामुळे त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. तर एअरबॅग्ज असल्याने कारमधील प्रवाशांनाही दुखापत झाली नाही. पण बसमधील १० प्रवासी जखमी झाले आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सिग्नल लाल असतानाही एक खाजगी बस अतिशय वेगाने रस्ताच्या दुसऱ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी मुख्य रस्त्यावर ग्रीन सिग्नल असल्याने एक एसयूव्ही कारही भरधाव वेगाने जात होती. अशात दोन्ही गाड्या एकमेकांसमोर आल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, बससह एसयूव्ही कारही रस्त्याच्या दुसऱ्या दिशेने जाऊन पलटी झाली.
या अपघातात बस चालकासह अन्य १० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातावेळी बसमध्ये ३० प्रवासी उपस्थित होते. या अपघातानंतर रस्त्यावर किमान ४० मिनिटे चौकाचौकावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. यानंतर पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने बस रस्त्यावरून हटवली. त्यानंतरच वाहतूक सुरळीत झाली.