न्यूझीलंडचा दिग्गज फिरकीपटू इंद्रबीर सिंग सोधी म्हणजेच ईश सोधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोधीने अलिकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) पंजाबी भाषेत समालोचन केले. भारतीय वंशाच्या सोधीचा हा व्हिडिओ आयसीसी आणि टी-२० विश्वचषकाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे.

ईश सोधीचा जन्म ३१ ऑक्टोबर १९९२ रोजी लुधियाना, पंजाब येथे झाला. जेव्हा तो चार वर्षांचा होता तेव्हा त्याचे पालक न्यूझीलंडमध्ये स्थलांतरित झाले. आयसीसीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘आमचे पंजाबी समालोचक इंद्रबीर सिंग सोधीला भेटा.’ या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे.

”सत श्री अकाल जी, माझे नाव इंद्रबीर सिंग सोधी. मला वाटते आजकाल पंजाबीतही कॉमेंट्री व्हायला हवी. तर मी सुरुवात करणार आहे, माझ्यासोबत चला. गोलंदाज समोरून येत आहे, चेंडू आत येत आहे आणि हा शॉट खेळला आहे, अरे बॅटची कड लागली आहे. लाथ मारली, ख्रिस्तियानो रोनाल्डो”, असे गमतीशीर समालोचन सोधीने या व्हिडिओत केले आहे.

हेही वाचा – विषयच संपला ना भाऊ..! भारताचा नवा कप्तान म्हणून ‘या’ खेळाडूला द्रविडनं दिली पहिली पसंती

टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाने दमदार कामगिरी केली आहे. गट २ मध्ये न्यूझीलंड संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी मागील सामन्यात स्कॉटलंडचा १६ धावांनी पराभव करत दोन महत्त्वाचे गुण मिळवले. या विजयात सोधीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने स्कॉटलंडच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले.

हिंदी बोलण्यास दिला होता नकार…

काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर एका पत्रकाराने सोधीला हिंदीमध्ये उत्तर देण्याची विनंती केली. यावेळी त्याने ”माझी हिंदी इतकी चांगली नाही आणि जर माझ्या आईने पाहिले आणि तिला काही चूक आढळली तर मी मार खाईन”, असे म्हटले होते.