बायोलॉजी म्हणजेच जैवशास्त्रामधील आकृत्या म्हणजेच ड्रॉइंग्स म्हटलं की सर्वात आधी कपाळावर आठ्या पडतात त्या सायन्सला असणाऱ्या ११ वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना. अर्थात नंतरही या क्षेत्रामध्ये शिकताना वेळेवेळी या आकृत्यांशी अभ्यासाच्या निमित्ताने संबंध येतोच. कधी पानांमधील रचना तर कधी मानवी शरीराची रचना आकृत्यांमधून दाखवण्याचं मोठं टास्कच यानिमित्ताने विद्यार्थ्यांसमोर असतं. मात्र तैवानमधील एका प्राध्यापकाची सध्या जगभरामध्ये चर्चा आहे ती याच आकृत्यांसाठी होत आहे.

झोहांग कुवाबीन असं या तरुण प्राध्यापकाचं नाव असून तो तैवानमधील शुंदे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये शिकवतो. सध्या तो इंटरनेटवर चर्चेत असण्याचं कारण तो शिकवताना फळ्यावर केवळ खडूच्या सहाय्याने काढणाऱ्या मानवी सांगाड्याचा आकृत्या. केवळ पट्टी आणि खडूच्या मदतीने झोहांग इतक्या सहजपणे या आकृत्या काढतो की त्या एखादं डिजीटल अॅनिमेशन किंवा ग्राफिक वाटावं. अगदी मानवी सांगाड्यापासून ते डोळ्यांमधील रचना कशी असते यापर्यंतच्या सर्व आकृत्या झोहांग फळ्यावर सहज काढतो. मानवी शरीर रचना म्हणजेच ह्युमन अॅनाटॉमीची चांगलीच ओळख झोहांगला असल्याचं या व्हायरल फोटोंमधून दिसतं. केवळ मानवी शरीराचीच नाही तर तितकीच जाण त्याला चित्रकलेचीही आहे. आशियामधील अनेक देशांबरोबरच युरोपीयन आणि पाश्चिमात्य देशांमध्येही झोहांगच्या या कलेला पाहून अनेकजण थक्क झाल्याचं इंटरनेटवरील कमेंट्समधून दिसून येत आहे.

याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानवी शरीरामधील प्रत्येक हाड आणि बारीक सारीक गोष्टी सहजपणे फळ्यावर रेखाटणारा झोहांग बायोलॉजी शिकवत नाही. तो मानवी शरीररचना म्हणजेच अॅनटॉमीचा एक्सपर्ट नाहीय. झोहांग हा या विद्यापिठामध्ये अॅनाटॉमी इलेस्ट्रेशन्स आणि ड्रॉइंग स्कील्स शिकतो. तो या विद्यापिठातील व्हिज्यूअल कम्युनिकेशन डिझान विभागात कामाला आहे. मानवी शरीरामधील रचना दाखवताना आकृत्या कशा काढाव्यात हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्याला आता तैनावबरोबरच चीन आणि जपानमधूनही अनेक विद्यापिठांनी आमंत्रित केलं आहे. “हो आपल्याकडे पुस्तकं आहेत. पण केवळ पुस्तकांमधील आकृत्या बघून त्या काढता येत नाहीत. अनेकदा आकृत्या काढताना आपल्याला त्या शिकता येतात. माझ्या वर्गामध्ये अनेकदा विद्यार्थ्यांना मी जे फळ्यावर काढतो ते त्यांच्या वहीमध्ये काढावं लागतं,” असं झोहांग सांगतो. मागील अनेक वर्षांपासून तो हे काम करतोय.

झोहांगला वैद्यकीय शास्त्रामध्ये सुरुवातील काही फार रस नव्हता. तो त्याने काढलेल्या आकृत्या सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करायचा. त्याचपासून त्याला एकदा एका विद्यापिठामध्ये मानवी शरीराची रचना काढून दाखवण्यासंदर्भातील नोकरीची संधी मिळाली. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. याच क्षेत्रात आपल्याला चांगलं ज्ञान आहे हे समजल्यानंतर झोहांगने मनापासून वैद्यकीय क्षेत्राचा आणि मानवी शरीर रचनेचा अभ्यास केला आणि या कलेमध्ये कौशल्य प्राप्त केलं.