भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर आणि त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही तणाव पडत आहे. असं असतानाच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या काही हृदयद्रावक कथा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जगासमोर मांडल्या जात आहेत. अशीच एक गोष्ट सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. करोनामुळे मरणासन्न अवस्थेत असणाऱ्या आपल्या आईशी बोलण्याची इच्छा एका महिलेच्या मुलानी व्यक्त केल्याची पोस्ट सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.

डॉ. दिपशिखा घोष यांनी घडलेल्या प्रकार सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सांगितलं आहे. “आज मी माझी शिफ्ट संपवत असतानाच उपचार सुरु असणाऱ्या मात्र जगण्याची शक्यता कमी असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल्स करत होते. आम्ही सामान्यपणे असे कॉल करतो. जर त्यांना काही सांगायचं असेल तर असा विचार करुन आम्ही हे कॉल करतो. त्यावेळी महिलेच्या मुलाने थोडा वेळ मागितला आणि त्याने मृत्यूच्या दाराशी असणाऱ्या आपल्या आईसाठी एक गाणं गायलं,” असं घोष यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये घोष यांनी, “तो मुलगा, तेरा मुझसे है पहले का नाता कोई गाणं गायला. मी तिथे केवळ फोन पडकून उभी होते. आईसाठी गाणं गाणारा मुलगा आणि त्या महिलेकडे पाहत होते. त्यानंतर नर्स आल्या आणि माझ्या बाजूला उभ्या राहिल्या. गाणं गात असतानाच तो मुलगा रडू लागला पण त्याने रडत रडतच गाणं पूर्ण केलं. त्याने आईच्या प्रकृतीची माहिती घेतली, माझे आभार मानले आणि फोन बंद केला,” असं सांगितलं आहे.

“मी आणि नर्स तिथेच उभे होतो. आम्ही कॉल संपल्यावर एकमेकांकडे पाहिलं तेव्हा आमचे डोळे पाणावले होते. त्यानंतर नर्स त्यांना नेमूण दिलेल्या रुग्णांच्या बेड जवळ जाऊन आपलं काम करु लागल्या. या घटनेमुळे माझ्यासाठी या गाण्याचा अर्थ पूर्णपणे बदलून गेलाय. आता माझ्या दृष्टीने हे गाणं त्या दोघांसाठीच झालं आहे, कायमचं!” असं घोष तिसऱ्या ट्विटमध्ये सांगतात.

घोष यांचे हे ट्विटस व्हायरल झाले आहेत. आठ हजारांहून अधिक जणांनी हे ट्विट शेअर केलं आहे.